लातूर : प्रतिनिधी
शहरात जून महिन्यात पहिल्यांदाच सोमवारी मोठा पाऊस पडला. सुमारे एक तास दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मेन रोडवरील गटारी तुंबल्याने गटारीचे घाण पाणी रस्त्याने वाहत होते. शहराच्या सखल भागांत पाण्याचे डोह साचले आहेत. पहिल्याच मोठ्या पावसाने लातूर शहर महानगरपालिकेच्या साफसफाईच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.
पावसाळ्यात नाले, गटारे आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे काम अत्यंत महत्त्वाचे असते दूषित पाणी, साचलेला कचरा आणि डासांमुळे होणारे आजार टाळण्यासाठी स्वच्छता व आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी महत्वाची असते. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेने शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवुन शहरातील छोटे, मोठे नाले, गटारिंची साफसफाई केली होती. साफसफाईचे हे काम अतिश्य गुणवत्तापुर्ण झाल्याचा दावाही महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून करण्यात आला होता. परंतु, सोमवारी शहरात पडलेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने महापालिकेच्या स्वच्छा विभागाचा दावा खोटा ठरवला. अनेक ठिकाणी नाले, गटारी तुंबून घाण पाणी रस्त्याने वाहत होते. सखल भागात पाण्याचे डोह साचले आहेत. काही घरांमध्ये पाणी शिरले आहे.
या मोठ्या पावसाने शहरातील इस्लामपूरा, अंजलीनगर, इंदिरानगर, राजीवनगर, नांदगाव वेस आदी सखल भागात पाणीचा पाणी झाले आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तू भिजुन नुकसान झाले आहे. मुख्यत: शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेल्या महात्मा गांधी चौकातील गटारी तुंबल्याने गटारीतील घाण पाणी रस्त्याने वाहत होते. जुने गुळ मार्केट चौक, डालडा फॅक्टरीसमोरचा रस्ता आणि सम्राट चौक या भागातील गटारी तुंबून गटारीतील सर्व घाण, कचरा रस्त्यावर आला. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळांची अवस्था तर सोडाच, चक्क महानगरपालिकेच्या दारात पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे.
















