जळकोट : प्रतिनिधी
जळकोट ते वांजरवाडा या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्याच्या विकासासाठी आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता आजही अरुंद अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जळकोट आणि वांजरवाडा परिसरातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक दररोज या मार्गाचा वापर करतात मात्र रस्ता अरुंद असल्याने वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था खराब झाल्यामुळे अपघातांचाही धोका वाढला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अनेकदा मागणी करण्यात आली. विविध स्तरांवर निवेदने देण्यात आली, तसेच लोकप्रतिनिधींनी आश्वासनेही दिली मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये निराशा पसरली आहे. विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना जळकोट-वांजरवाडा रस्त्याचे काम रखडणे हे जळकोटकरांच्या अस्मितेला धक्का देणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या मार्गावरून कृषी मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. रस्ता अरुंद असल्यामुळे शेतक-यांना माल बाजारपेठेत पोहोचवताना अडचणी येत आहेत तसेच विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांनाही प्रवास करताना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी शासन आणि संबंधित विभागाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन जळकोट-वांजरवाडा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक संघटनांनी दिला आहे. सन २००२ मध्ये जळकोट शहरातील नागरिकांनी एकत्र येत श्रमदानामधून अगदी काही दिवसांमध्ये ४ किलोमीटरचा रस्ता पूर्ण केला होता. विशेष म्हणजे हा रस्ता पाणंद रस्ता होता आणि जळकोटकरांनी एकत्र येत हातामध्ये टिकाव, फावडे, कु-हाड, कत्ती, असे साहित्य घेत अगदी एका दिवसामध्ये श्रमदानातून हा रस्ता पूर्ण केला.
हा रस्ता पूर्ण केल्यानंतर लोकप्रतिनिधी या रस्त्याचा विकास करतील अशी अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा फोल ठरली. श्रमदानातून जेवढा रस्ता झाला होता तेवढ्याच रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. वारंवार निकृष्ट रस्ता करण्यात आला. रस्ता कामा सुरुवात करून मध्येच सोडून देण्यात आला. एक तर या रस्त्याचे रुंदीकरण होणे अपेक्षित होते तसेच हा रस्ता जिल्हा मार्ग ते राज्य महामार्ग जोडून या रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचा रस्ता करणे आवश्यक होते परंतु या रस्त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्षच करण्यात आले. एकीकडे उदगीरच्या वळण रस्त्यासाठी ४०० कोटी रुपये मंजूर होतात आणि दुसरीकडे जळकोटकरांची अस्मिता असणा-या रस्त्यास मात्र निधी मिळत नाही यास काय म्हणावे असा सवालही उपस्थित होत आहे .
















