लातूर : प्रतिनिधी
लातूर रेल्वे स्थानकावरील पीटलाईनच्या कामाला आता ब-यापैकी गती आली आहे. त्यामुळे हे काम येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. रेल्वे स्थानकावरील विविध विकासकामांना आता कमालीची गती मिळाली असून, प्रवाशांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
खासदार डॉ. शिवाजी काळगे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर आणि रेल्वेच्या विभागीय अभियंत्यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकाला भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यामुळे प्रवाशांच्या सुविधेत मोठी भर पडणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ ची लांबी-रुंदी वाढवणे, नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक ३ चे काम वेगाने सुरू आहे. गर्दी टाळण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार, नवीन फूट ओव्हर ब्रिज, आणि लिफ्टची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला सीआरपी पोलिसांची नियुक्ती आणि मालधक्क्यावरील प्लॅटफॉर्मवर शेडचे कव्हर बसवण्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. यामुळे आगामी काळात लातूर रेल्वे स्थानक अधिक सुसज्ज आणि सुरक्षित होणार आहे.
















