वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगावर संकटांचे ढग दाटले आहेत. खनिज तेलाचे दर प्रतिबॅरल १२० डॉलरकडे सरकू लागले आहेत. मध्य पूर्व आशियात युद्ध सुरू असल्याने जगातील अनेक देशांमध्ये खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक रोखत जगाच्या गळ््याची नस दाबली आहे. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना धोका निर्माण झाला आहे.
जगाची दैनंदिन तेल गरज १० कोटी बॅरल इतकी आहे. यातील २० टक्के खनिज तेलाचा पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी जगासाठी महत्त्वाची आहे. या भागातून बहुतांश तेल टँकर चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरियाला जातात. होर्मुझमधून जाणारा निम्मा तेल साठा याच ४ देशांकडे जातो. त्यामुळे होर्मुझमधील वाहतूक ठप्प झाल्यास त्याचा थेट फटका आशियातील ४ महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांना बसतो.
होर्मुझमधून होणारी तेल वाहतूक ठप्प झाल्यास जगाला इतिहासातील सर्वात मोठा तेल धक्का बसू शकतो. १९७३ मध्ये योम किप्पूर युद्धाने जगभरातील बाजारपेठा हादरल्या होत्या. होर्मुझमधील वाहतूक बंद झाल्याने दररोज ४० ते ५५ लाख बॅरल वाहतूक बंद झाली. १९७८-७९ मध्ये इराणी क्रांतीवेळी ५० ते ६० लाख बॅरलचा फटका दिवसाला बसत होता. १९८० मध्ये इराण-इराक युद्धात दर दिवशी ४० लाख बॅरल तेल वाहतूक ठप्प झाली. आता होर्मुझमुळे बसणारा फटका थेट २ कोटी बॅरलच्या घरात जातो. त्यामुळे दिवसाकाठी होणारे नुकसान प्रचंड आणि अभूतपूर्व आहे.
भारतात वित्तीय तूट
वाढण्याचा धोका
भारताला लागणा-या खनिज तेलापैकी ८५ टक्के तेल आयात करावे लागते. त्यामुळे तेलाचे दर वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो. तेलाच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्यास महागाई वाढू शकते, असे रिझर्व्ह बँकेची आकडेवारी सांगते. विकासाचा वेग मंदावण्याची भीती आहे. तेलाच्या दरांमध्ये वाढ झाल्यास वित्तीय तूट वाढ शकते.
भारताला रोज ६० लाख
बॅरल्स खनिज तेल लागते
जगाच्या एकूण तेल वाहतुकीपैकी २० टक्के वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालते. जगापेक्षा भारतासाठी असलेली अडचण जास्त आहे. भारताला दररोज ६० लाख बॅरल्स खनिज तेल लागते. यातील ८८ टक्के खनिज तेल भारत आयात करतो. भारत दिवसाकाठी ५२ ते ५४ लाख बॅरल्स तेल आयात करतो.
भारतासाठी स्थिती चिंताजनक
आखाती देशांमध्ये युद्ध सुरु होण्याआधी भारताला दररोज २१ ते २२ लाख बॅरल खनिज तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत होते. भारताच्या एकूण आयातीच्या ६० टक्के एलएनजीदेखील होर्मुझमधून येतो. त्यामुळे भारतासाठी ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. युद्धाचा चांगलाच भडका उडाल्याने आणि इराणने आक्रमक भूमिका घेऊन होर्मुझ सामुद्रध्वनीतून होणारी जहाजांची वाहतूक रोखल्याने याची फार मोठी किंमत भारतासह इतर देशांना मोजावी लागू शकते.

