मुंबई : प्रतिनिधी
राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला जुलै महिन्यात तब्बल १३८.६३ कोटींचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. नियंत्रण अधिका-यांचा दौराही एसटीला नफा मिळवून देऊ शकला नाही. जुलै महिन्यात महामंडळाच्या ३१ विभागांपैकी केवळ तीन विभाग नफ्यात राहिले, तर तब्बल २८ विभाग तोट्यात आहेत.
उत्पन्न वाढविण्यासाठी ‘नियंत्रण अधिकारी’ म्हणून महामंडळातील महाव्यवस्थापक पदावरील वरिष्ठ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, अधिकारी-कर्मचा-यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याऐवजी दौरे करून निलंबनाची कारवाई करण्यावरच भर दिल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या कारवायांनंतरही एसटीच्या आर्थिक स्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.
जुलैमध्ये एसटीला सुमारे ९५८.२३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. मात्र, महामंडळाचा खर्च १,०९६.८६ कोटी रुपये झाला. त्यामुळे महिन्याअखेरीस १३८.६३ कोटी रुपयांचा तोटा नोंदविण्यात आला. नियंत्रण अधिका-यांनी दौरे केलेल्या विभागांपैकी नाशिक आणि सातारा विभागांची आर्थिक कामगिरीही समाधानकारक ठरलेली नाही.
नाशिकनंतर कोल्हापूरला सर्वाधिक झाला तोटा
सर्वाधिक तोट्यात असलेल्या विभागांच्या यादीत नाशिकनंतर कोल्हापूरचा क्रमांक असून या विभागाला सुमारे १३.०७ कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यानंतर रत्नागिरी ९.३२ कोटी, सातारा ८.३२ कोटी आणि सांगली ८.२३ कोटी तोट्यात आहेत.
धाराशिव विभागाला जुलैमध्ये सुमारे २७.४७ कोटी रुपयांची वाहतूक प्राप्ती झाली. या विभागाचा एकूण खर्च सुमारे ३१.८२ कोटी रुपये असून, त्यामुळे सुमारे ४.३५ कोटी रुपयांचा तोटा झाला. जुलैमध्ये नाशिक विभाग सर्वाधिक तोट्यात असून त्याला १३.४८ कोटी रुपयांचा तोटा झाला. सातारा विभागाला सुमारे ८.३२ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
एकाच खात्याला २ जीएम; कर्मचा-यांमध्ये संभ्रम
वाहतूक खात्याचे महाव्यवस्थापक (जीएम) कार्यरत असतानाच खात्याची जबाबदारी आणखी एका समकक्ष अधिका-याकडे सोपविली आहे.
उत्पन्नवाढीच्या कामकाजाबाबत अधिका-यांमध्येच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. नेमक्या कोणत्या अधिका-यांच्या सूचनांचे पालन करायचे, याबाबत कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित अधिका-यांवर होणार कारवाई
एसटीच्या उत्पन्नासंदर्भात २ किंवा ३ सप्टेंबर रोजी बैठक घेणार आहोत. त्यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील उत्पन्न व खर्चाचा आढावा घेतला जाईल. उत्पन्नवाढीशी संबंधित त्रुटी आढळल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल. मोठे बदल करायचे असतील तर कारवाई ही करावीच लागेल.
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
















