लातूर : प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ २०२६’ मध्ये १५ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य अशा २५ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावून दयानंद कला महाविद्यालयाने ऐतिहासिक कामगिरी केली. या सुवर्णयशानंतर महाविद्यालयात विजयी ट्रॉफीचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. दयानंद सभागृहामध्ये आयोजीत विशेष सत्कार सोहळयात महोत्सवात निर्विवाद वर्चस्व गाजवणा-या विजेत्या कलावंत विद्यार्थ्यांचा, त्यांना मार्गदर्शन करणा-या प्राध्यापकांचा दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष लाहोटी यांनी सर्व कलावंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन अभिनंदन केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम पारितोषिक विजेत्या कलावंत विद्यार्थ्यास ११ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक विजेत्यास ७ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक विजेत्यास ५ हजार रुपये रोख बक्षीस म्हणून देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. आमच्या विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले आणि त्यांनी संस्थेचे नाव संपूर्ण परिसरात उज्ज्वल केले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भविष्यातही या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात पुढे जाण्यासाठी संस्था सर्वतोपरी सहकार्य करेल, असे लाहोटी म्हणाले.
या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललीतकुमार शाह, रमेशकुमार राठी, मकरंद सावे, सचिव रमेश बियाणी, विशाल लाहोटी, अॅड. श्रीकांत उटगे, अजिंक्य सोनवणे, संजय बोरा, रवींद्र व्होरा, अशोक पाटील, सिद्धेश्वर कोरे, चैतन्य भार्गव, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. प्रशांत दीक्षित, संजय व्यास आदीनी कौतुक केले.
या महोत्सवाची पूर्वतयारी व यशासाठी सांस्कृतिक व विद्यार्थी विकास विभागप्रमुख डॉ. संतोष पाटील, डॉ. देवेंद्र कुलकर्णी, प्रा. डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. शरद पाडे, प्रा. विजय मस्के, प्रा. मनिषा आष्टे, प्रा. सूरज साबळे, प्रा. हरी कुंभार, प्रा. शशिकांत देशमुख, प्रा. डॉ. वृषाली देशमुख, प्रा. अरुंधती गायकवाड, प्रा. जिमी शिरोळे यांच्यासह प्रा.ज्योतिबा बडे, पुरुषोत्तम गोदाम, शैलेश आदमाने, गणेश जगदाळे, सुशील सूर्यवंशी, सिद्धार्थ सूर्यवंशी, श्वेता तंत्रे आणि विशाल टोले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष पाटील यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. संदीपान जगदाळे यांनी केले. तर आभार डॉ. अंजली जोशी यांनी मानले.
















