परभणी : जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंतांना राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेचा लाभ मिळावा. प्रलंबित असलेले सन २०२५-२६, २०२६-२७ चे मानधन प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, अशी मागणी ज्येष्ठ कलावंतांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, ज्येष्ठ कलावंतांनी शासनाच्या नियमानुसार ऑनलाइन प्रस्ताव भरून संबंधित पंचायत समितीकडे सादर केले आहेत. मात्र, जिल्हा संबंधित विभागाच्या प्रशासकीय प्रक्रियेमुळे प्रस्तावांना विलंब होत असल्याने ज्येष्ठ कलावंतांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासन निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ कलावंतांचे १०० प्रकरणे दरवर्षी निकाली काढण्याबाबत निर्णय आहे. जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये ७५ प्रस्ताव निकाली काढण्यात आले असून, उर्वरित २५ प्रस्तावांना मंजुरी देऊन शासन निर्णयाप्रमाणे १०० चे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सन २०२५-२६ व २०२६-२७ चे प्रलंबित प्रस्तावही तात्काळ निकाली काढावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर नामदेव ढेपे, बळीराम आरगडे, भाकर गोडबोले, मल्हारी खंडागळे, भारत कांबळे, अशामती कदम, रेखा मनेरे, सुरेश अंभोरे, प्रभाकर रगडे, उत्तम खिलारे, अशामती वावळे, गीताबाई नरवडे, कौसाबाई कदम, सुलाबाई मगर, विक्रम डोंगरे, भीमराव लाटे, संजीवनी लाटे, वच्छलाबाई कांबळे, सुमनबाई गायकवाड यांच्या स्वाक्ष-या आहेत.
















