28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसंपादकीय विशेषटिकवूया मातीचा कस

टिकवूया मातीचा कस

जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी वर्षानुवर्षे रासायनिक घटकांचा वापर केल्यामुळे मातीचा पोत बिघडला. पूर्वीच्या काळी मातीची उत्पादकता कायम राखणारे आणि वाढविणारे घटक नेमके कोणते, हे शास्त्रीय भाषेत शेतक-यांना ठाऊक नव्हते; परंतु हे घटक पिकांना मिळतील अशा प्रकारे पिकांचे चक्र कसे आखावे, याचे ज्ञान त्यांना होते. हजारो वर्षांपासून जोपासलेल्या या शेतीपद्धतीने रासायनिक घटकांचा वापर सुरू होण्याच्या काळापर्यंत जमिनीची उत्पादकता टिकवली. जमिनीचा पोत कायम राखून निसर्गसाखळी अबाधित राहील, हेच या पुढे शेती क्षेत्रातील संशोधनाचे उद्दिष्ट असायला हवे.

प्रमाणे जगाच्या प्रत्येक भूभागात वेगवेगळी खनिजसंपत्ती आढळते तसेच प्रत्येक भागात वेगवेगळी पिके येतात. एकाच देशाच्या विविध भागांमध्ये पिकांमध्ये वैविध्य आढळून येते. आपल्याही देशात वेगवेगळ्या राज्यांमधील पिके वेगवेगळी आहेत आणि त्यामुळेच त्यातील खाद्यसंस्कृतीही वेगवेगळी आहे. म्हणूनच आपण पंजाबात गेल्यावर तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो तर बंगालमध्ये वेगळ्या पदार्थांची चाखू शकतो. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती वेगळी आहे आणि केरळची वेगळी. हे वैविध्यच आपली मोठी संपत्ती आहे. प्रत्येक ठिकाणची माती वेगवेगळी असल्याने, पावसाचे प्रमाण आणि भौगोलिक रचना वेगवेगळी असल्यानेच पिकांमध्ये वैविध्य आढळते; परंतु विशिष्ट नगदी पिकांच्या आकर्षणापायी आपण हे वैविध्य नष्ट करण्यास सुरुवात केली. तातडीने पैसा मिळवून देणारी पिके घेण्यासाठी मातीवर रासायनिक खतांचा मारा केला. रासायनिक तणनाशके आणि जंतुनाशके वापरून जमिनीचा पोत बिघडवला. मातीला ‘काळी आई’ किंवा ‘काळे सोने’ म्हणण्याची संस्कृती विसरून आपण भलत्या बदलांच्या आहारी गेलो.

मातीची उत्पादकता टिकवून ठेवणा-या शेतीच्या ज्या पद्धती आहेत ते हरितगृह वायूंचे प्रमाण कमी ठेवून जलवायू परिवर्तनाचे संकट कमी करण्यास सा भूत ठरतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर जमिनीचा पोत कायम राखणा-या कृषिपद्धतींचे महत्त्व वाढले आहे. जी गोष्ट आपल्याकडे प्रचंड प्रमाणात असते तिच्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही आणि त्यामुळेच त्यात झालेले बदलही चटकन लक्षात येत नाहीत. मातीचे असेच झाले आहे. आपल्या अवतीभोवती माती प्रचंड प्रमाणात असते त्यामुळे तिची गुणवत्ता ढासळल्याचे आपल्याला दिसून येत नाही मात्र, जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादकता कमी झाल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि कोट्यवधी लोकांच्या जीवनावर मोठे दुष्परिणाम होत असतात. आपल्या भोवतालच्या मातीची स्वत:ची एक रचना असते. तिच्यात कोट्यवधी सूक्ष्म जीवाणूंचा वास असतो. आपल्याप्रमाणेच माती श्वसन करते आणि पाणी शोषून घेण्याची, हवा शोषून घेण्याची प्रणाली मातीमध्ये असते. या प्रणालींची एक संपूर्ण साखळी मातीमध्ये असते. रासायनिक पदार्थांच्या अतिवापरामुळे ही साखळी विखंडित होते आणि त्यामुळेच जमिनीचा पोत बिघडतो.

वृक्षतोड आणि जंगले साफ करून टाकण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते. झाडे जमिनीवर पडणा-या पावसाचा वेग कमी करतात आणि झाडांची मुळेही मातीला घट्ट पकडून ठेवतात. परिणामी उतारावरून वाहून जाणा-या पाण्याद्वारे माती वाहून जाण्याचे प्रमाण घनदाट वृक्षराजी असलेल्या भागात कमी असते; परंतु वृक्षतोड झाल्यास मातीची धूप होण्याचे प्रमाण वाढते. पावसाच्या पाण्याची स्थानिक पातळीवर साठवणूक करण्याचे पारंपरिक मार्ग मागे पडून मोठी धरणे झाली त्यामुळे ही समस्या आणखी वाढली आहे. माती वाहून जाण्यामुळे जमिनीचा कसही कमी होतो. एकीकडे मातीचा कस कायम ठेवण्याच्या परंपरागत शेतीपद्धती मागे पडताना दिसतात तर दुसरीकडे खतनिर्मिती करणारे कारखानेही अशा रसायनांचा वापर करतात ज्यामुळे जमिनीचा कसदारपणा हळूहळू कमी होत जातो. गेल्या ५० वर्षांत रासायनिक शेतीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला त्यामुळे मातीला पोषक घटक प्रदान करणारी नैसर्गिक साखळीच डळमळीत झाली. उदाहरणार्थ, मातीची धारणक्षमता वाढविण्याचे तसेच हवा खेळती राहावी म्हणून माती भुसभुशीत करण्याचे काम विंचवासारखे प्राणी करतात. असे प्राणी रासायनिक घटकांमुळे जीव गमावतात आणि मग पोषक घटकांसाठी त्या मातीला सातत्याने कृत्रिमरित्या दिल्या जाणा-या रासायनिक घटकांवरच अवलंबून राहावे लागते. मधमाशा, फुलपाखरे, बेडूक आदी शेतक-यांना उपयुक्त ठरणा-या जिवांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. पिकांच्या परागीभवनासाठी मधमाशा अत्यंत उपयुक्त
ठरतात.

रासायनिक घटकांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतीलगत असणारे पाण्याचे स्रोत तसेच जमिनीच्या पोटातील जलस्रोत दूषित होतात. सिंचनासाठी अनेक ठिकाणी भूगर्भातील पाण्याचा वापर केला जातो. हे स्रोत अधिक उपशामुळे खोलवर तर गेलेच आहेत शिवाय ते प्रदूषित झाल्यामुळे त्याचाही दुष्परिणाम पिकांवर पाहायला मिळतो. भूपृष्ठावरील जलस्रोत किंवा भूपृष्ठावर पाण्याच्या साठवणुकीचे पारंपरिक मार्ग मर्यादित झाल्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे तसेच रासायनिक खतांमुळे मातीत आम्लांचे प्रमाण वाढून जैविक घटकांवर आणखी दुष्परिणाम होत आहे. शेतीविषयक जे संशोधन केले जाते ते प्रामुख्याने अधिक पीक मिळण्याच्या उद्देशाने केले जाते; परंतु त्यामुळे नैसर्गिक साखळीवर जे गंभीर दुष्परिणाम होतात त्याकडे कानाडोळा केला जातो. निसर्गात एकमेकांवर अवलंबून असणारे असंख्य घटक असतात. त्यांच्या क्रिया-प्रक्रियांचा अभ्यास केल्यास आपल्याला असे दिसते की, जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्याची नैसर्गिक सोय केलेली असते. हेच नैसर्गिक घटक पिकांनाही पोषक घटक पुरवत असतात.

आपण मात्र अधिक पिकाच्या अपेक्षेने ही साखळी नष्ट केली. पिकांना अनेक पोषक घटकांची अपेक्षा असते. मातीद्वारे मिळणारे पोषक घटक काही पिकांना कमी प्रमाणात तर काही पिकांना अधिक प्रमाणात लागतात. या घटकांची शास्त्रीय नावे आपल्या पूर्वजांना माहीत नव्हती; परंतु अनेक पिढ्यांच्या अनुभवांनी त्यांना दिलेले शिक्षण मोठे होते. नायट्रोजन आणि फॉस्फरस ही नावे त्यांना सांगता येत नसतील; परंतु प्रत्येक पिकाला संतुलित प्रमाणात हे घटक कोणत्या मार्गाने देता येतील, हे त्यांना ठाऊक होते. या मार्गांचा अवलंब ते अचूकपणे करीत असत. उदाहरणार्थ, कडधान्यांच्या पिकांमध्ये हवेतील नायट्रोजन ग्रहण करण्याची मोठी क्षमता असते. हा नायट्रोजन रासायनिक खतांपासून प्राप्त न करता पिकांचे चक्र व्यवस्थित आखले जात असे. पिकांमध्ये योग्य वेळी बदल करून जमिनीचा कस टिकवून ठेवण्याचा मार्ग त्यांना ठाऊक होता. वेगवेगळ्या पिकांची मुळे जमिनीत वेगवेगळ्या अंतरापर्यंत खोल जातात. त्या-त्या भागात वेगवेगळे पोषक घटक असतात त्यामुळे पिकांचे चक्र आखताना ते आलटून-पालटून ही पिके घेत असत. एका नैसर्गिक घटकाचे उत्सर्जन करणारे एक पीक ते घेत असत तर त्या नंतरचे पीक त्या घटकाची गरज असणारे घेत असत.

शेतीपूरक जनावरे आणि अन्य जीवांची माहिती शेतक-यांना होती. शेतीउपयुक्त जनावरांचे शेण, मागील पिकांचे उरलेले अवशेष, पाने आदी घटकांच्या माध्यमातून जमिनीची उत्पादकता टिकवता आणि वाढवता येते. जनावरांपासून मिळणारे नैसर्गिक खत कमी पडल्यास फिरस्त्या पशुपालकांना आमंत्रित करून त्यांच्याकडील जनावरे शेतात ठेवत असत. पिके काढल्यानंतर त्या जमिनीवर अशा प्रकारे जनावरे राहिली तर त्यांच्या मलमूत्रापासून आणि पिकाच्या अवशेषांमधून उत्कृष्ट नैसर्गिक खत तयार होते. विविध प्राण्यांच्या मलमूत्रातून शेतीला असे कोणते घटक मिळतात जेणेकरून तिची उत्पादकता वाढते, याचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न संशोधक आजही करीत आहेत. ही शेतीपद्धती जमिनीचा कस राखणारी तर आहेच शिवाय शेतक-यांच्या दृष्टीने अत्यंत स्वस्त आहे त्यामुळेच पारंपरिक शेतीकडे वळून जमिनीची उत्पादकता कायम राखण्याचे प्रयत्न या पुढे व्हायला हवेत. रासायनिकीकरणाने मातीचा कस एकदा बिघडला तर तो पूर्ववत होणे अवघड आहे.

-नवनाथ वारे, शेतीप्रश्नांचे अभ्यासक

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR