डेहराडून : वृत्तसंस्था
टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळून मोठा अपघात झाला असून या अपघातात २ भाविकांचा मृत्यू झाला. या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये तब्बल १९ भाविक आणि एक चालक असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. यातील दहा जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. इतर भाविक बेपत्ता असल्याचेही या सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, टेम्पो ट्रॅव्हलर भाविकांना घेऊन बद्रीनाथकडे जात होता. यावेळी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील घोलतीरजवळ हा टेम्पो ट्रॅव्हलर अनियंत्रित झाला. त्यानंतर हा टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळला. त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलरमधील भाविक नदीत कोसळले. यात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ८ भाविकांना बचावण्यात यश आले. मात्र तब्बल १० भाविक बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच घोलतीर पोलिस ठाण्यातील पोलिस आणि रुद्रप्रयागमधील एसडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बचाव पथकाने बचावकार्य करत काही भाविकांना बाहेर काढण्यात यश मिळवले. अलकनंदा नदीचा मोठा प्रवाह मदत आणि बचावकार्यात आव्हान ठरत आहे. बचाव पथक सतत प्रयत्न करत आहे. स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाला मोठी मदत केली.