मुंबई : प्रतिनिधी
ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार असल्याचा दावा ठाणे मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी आज शनिवारी (दि. ८) सकाळी माध्यमांशी बोलताना केला आहे.
नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, अनेक नगरसेवक, लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मूळ प्रवाहात येऊ पाहत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करून निर्णय घेणार आहेत. त्याचबरोबर ठाकरेंसोबतचे दोन खासदार बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत तर सहा खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. आपल्या मतदारसंघात कामे झाली पाहिजेत, विकास झाला पाहिजे यासाठी त्यांना नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्यांनी असेही सांगितले आहे की, त्यांना उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मान्य नाही.
संजय राऊतांना मानसोपचाराची गरज
गेली दोन वर्षे संजय राऊत सरकार पडणार असा दावा करत आहेत. राऊत यांना शरद पवार यांचा फोन येतो. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना बोलतात, ते पे रोलवर आहेत. त्यांना मानसोपचाराची गरज आहे.