29.1 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeलातूरडिजिटल युगात सुरक्षित महिला म्हणजे सक्षम समाज

डिजिटल युगात सुरक्षित महिला म्हणजे सक्षम समाज

लातूर : प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन सेवांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सोयीस्कर झाले असले तरी सायबर फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी फसवणूक, फोटो मॉर्फिंग यांसारख्या गुन्ह्यांपासून महिलांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. डिजिटल युगात सुरक्षित महिला म्हणजेच सक्षम समाज घडविण्यासाठी सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आवश्यक असल्याचे प्रतिपादन सायबर सुरक्षा तज्ज्ञ अशोक भिसे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील महिला कल्याण व तक्रार निवारण समितीच्या वतीने ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात भिसे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मुख शल्य तज्ज्ञ प्रा. डॉ. अमोल डोईफोडे, शैक्षणिक प्रभारी डॉ. गौरी उगले, ओरल पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. वर्षा सांगळे, महिला कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. स्रेहा चोले, संयोजक डॉ. शीतल नागीमे, समिती सदस्या डॉ. प्रियांका मुंडे तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी सुनील कवटेकर उपस्थित होते.
आज अनेक महिला शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि सामाजिक क्षेत्रात ऑनलाइन माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. मात्र या डिजिटल जगात सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावरील छळ, खोटी प्रोफाइल तयार करणे, फोटोचा गैरवापर अशा अनेक समस्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे महिलांनी सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आसल्याचे सांगून भिसे म्हणाले की, सायबर सुरक्षेसाठी सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती जसे की पत्ता, फोन नंबर किंवा बँक तपशील शेअर करू नये. मजबूत आणि वेगळे पासवर्ड वापरावेत तसेच ते कोणासोबतही शेअर करू नयेत. अनोळखी लिंक, ई-मेल किंवा मेसेजवर क्लिक करताना सावधगिरी बाळगावी. कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन त्रास होत असल्यास त्वरित तक्रार करून कायद्याची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
भारतामध्ये सायबर गुन्ह्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी सायबर क्राईम पोर्टल व हेल्पलाईन उपलब्ध असून महिलांनी भीती न बाळगता अशा घटनांची नोंद करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सायबर फसवणूक कशी होते याचे प्रात्यक्षिकही त्यांनी उपस्थितांना दाखवले. त्यानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रात महिला कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत माहिती घेतली.
या कार्यक्रमात बी.डी.एस. आंतरवासिता मृणाल कुलकर्णी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनावर प्रभावी भाषण सादर केले. तसेच तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणारे लघुनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे डॉ. स्रेहा चोले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्रुती इंगळे व वैष्णवी प्रयाग यांनी केले, तर आभार डॉ. शीतल नागीमे यांनी मानले. या कार्यक्रमास एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील महिला अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR