बंगळुरू : वृत्तसंस्था
जनता दल सेक्यूलरला कर्नाटकात मोठा धक्का बसला आहे. चन्नपटना सिटी म्युनिसिपल कौन्सिलमध्ये जेडीएसच्या १६ पैकी १३ नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षांतर कायद्यापासूनही या नगरसेवकांची सुटका झाली. १६ पैकी १३ नगरसेवकांनी हा निर्णय घेतल्याने दोन तृतीयांश बहुमत झाले आहे. इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवकांना काँग्रेसमध्ये सामावून घेण्यामागे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची रणनीती मानली जात आहे.
चन्नपटनामध्ये काँग्रेसला मजबूत करण्यासाठी डीके शिवकुमार यांनी हे पाऊल उचललं आहे. चन्नपटना एक वोक्कालिंगा बहुल तालुका आहे. ज्याठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आहे. ही राजकीय उलथापालथ चन्नपटना विधानसभा मतदारसंघात होणा-या पोटनिवडणुकीपूर्वी झाली आहे. चन्नपटना विधानसभा मतदार संघात एचडी कुमारस्वामी आमदार होते, परंतु ते मांड्या लोकसभा जागेवरून खासदार म्हणून निवडून आल्याने ही जागा रिक्त झाली.
शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी चन्नपटना पोटनिवडणुकीकडे व्यक्तिगत लक्ष दिले आहे. कारण याठिकाणी त्यांचे बंधू डिके सुरेश जे बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात भाजपा जेडीएस युतीकडून पराभूत झाले होते त्याचा बदला घ्यायचा आहे. ३१ सदस्यीय चन्नपटना सिटी म्युनिसिपल कौन्सिलसाठी २०२१ मध्ये निवडणूक झाली होती. त्यात जेडीएस १६, काँग्रेस-भाजप यांचे प्रत्येकी ७ आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. आता जेडीएसच्या १३ नगरसेवकांनी आणि एका अपक्षाने काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याने इथले राजकीय समीकरण बदलले आहे.