22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रडॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव

डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव

ससूनच्या दोन्ही डॉक्टरांवर कारवाईची टांगती तलवार
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी ससून रुग्णालयातील अटक करण्यात आलेले डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला आहे. यासोबतच तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमात वाढ केल्याने त्यांची एसीबीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. दरम्यान, डॉ. तावरेच्या घराची झडती मंगळवारी पोलिसांनी घेतली. रात्री उशिरापर्यंत ही झडती सुरूच होती.

ससून रुग्णालयातील डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी अपघातास जबाबदार ठरलेल्या धनिकपुत्राला निर्दोष सोडविण्यासाठी थेट रक्ताचे नमुने कच-यात फेकून दिले. त्यावरून डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना अटक केली. आता त्यांच्यावर पोलिसांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर आणि कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमवाढ केली आहे.

या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झाल्यास अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. तसेच निलंबनाच्या प्रस्तावाबाबत वैद्यकीय विभागाकडून लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याच्या प्रलंबित तपासाचा नुकताच आढावा घेतला होता. त्यात आकस्मात मृत्यूचे १ हजार ४०० गुन्हे प्रलंबित असल्याचे समोर आले होते. शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी डॉ. तावरे हा पोलिस कर्मचा-यांकडे पैशाची मागणी करीत असल्याचे समोर आले आहे.

बाल अधिकार आयोगाचे पत्र
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून पुणे पोलिसांना पत्र प्राप्त झाले आहे. अपघातातील अल्पवयीन आरोपीची ओळख उघड करणा-या दोन ट्विटर हँडलची माहिती आयोगाने पोलिसांना पाठविली. आयोगाने या दोन ट्विटर हँडलवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR