27.6 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeपरभणीतराफ्यावरून जीवघेणा प्रवास करीत ओलांडावे लागतेय नदीपात्र

तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करीत ओलांडावे लागतेय नदीपात्र

परभणी : धारणगाव येथील बहुतांश शेतक-यांच्या जमिनी वाडीदमई आणि साडेगाव शिवारात आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी दुधना नदीपात्र ओलांडून जावे लागते. परंतू या ठिकाणी पूल नसल्याने ग्रामस्थांना तराफ्यावरून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. या गोष्टीची तात्काळ दखल घेत या ठिकाणी पूल उभारण्यात यावा अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा धारणगावच्या संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

तालुक्यातील धारणगाव येथील ग्रामस्थांनी दि.२४ जून रोजी परभणी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धारणगाव येथील ग्रामस्थांची वडिलोपार्जित शेती जमीन वाडी दमई आणि साडेगाव शिवारात आहे. धारणगाव येथील ग्रामस्थांची ८० टक्के शेती ही वाडी दमई आणि साडेगाव शिवारात असल्याने धारणगाव येथील दुधना नदीच्या पात्रात समासापुर येथील बंधा-याच्या पाण्यामुळे येजा करण्यासाठी अडचण होत आहे.

सदरील नदीच्या पात्रात असलेल्या पाण्याची खोली अंदाजे १० ते १२ फूट खोल असल्याने शेतक-यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून दररोज प्रवास करावा लागत आहे. शेतक-याचा उदरनिर्वाह हा संपूर्णपणे शेतीवर अवलंबून असून शेतात पेरीनीच नाही केली तर आर्थिक अडचणी निर्माण होऊन उपासमारीची वेळ येईल.अगोदरच सावकाराचे तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत.

नदीत साठलेले पाणी सोडण्यासाठी समसापुर येथील ग्रामस्थ विरोध करीत आहेत. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी प्रशासनाने आम्हाला पुल बांधून द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून गावकरी करत आहेत. तसेच वारंवार जिल्हा प्रशासन आणि लोकप्रिनिधीकडून होत असलेली कुचंबणा थांबवण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

धारणगाव येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी मान्य नाही झाल्यास आगामी निवडणुकावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. या निवेदनावर धारणगाव येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR