मुंबई : प्रतिनिधी
अभिनेता अजय देवगणच्या २०२० साली प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा दाखवणा-या या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. तर अभिनेत्री काजोल हिची देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. यशानंतर आता या सिनेमाच्या सीक्वलची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे अजय देवगणने शेअर केलेली खास पोस्ट आहे.
‘तान्हाजी’ सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने अजय देवगणने खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून त्याने सिनेमाच्या सीक्वलची हिंट दिली आहे. ‘तान्हाजी’ सिनेमाचे एक स्केच अजय देवगणने शेअर केले आहे. ‘‘गड आला पण सिंह गेला; पण कथा अजून संपलेली नाही’’, असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अजय देवगणच्या या पोस्टमुळे ‘तान्हाजी’ सिनेमाचा सीक्वल येणार असल्याचे बोलले जात आहे.

