Homeसोलापूरसोलापुरात जुळ्या मुलांची हत्या करत पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापुरात जुळ्या मुलांची हत्या करत पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

 पोलिसांकडून गुन्हा दाखल; सखोल तपास सुरू

सोलापूर : प्रतिनिधी
ऐन संक्रांतीच्या तोंडावर करमाळा तालुक्यात एका सैतानी बापाचा क्रूर चेहरा समोर आला आहे. पोटच्या अवघ्या सात वर्षांच्या दोन जुळ्या मुलांना विहिरीत ढकलून देऊन त्यांची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश आणि श्रेया सुहास जाधव अशी मृत मुलांची नावे असून सदर घटना काल दुपारच्या सुमारास करमाळ्याच्या हिंगणी गावात घडली आहे. सुहास जाधव हे वीज कंपनीत कर्मचारी आहेत. घरात किरकोळ वाद झाल्याच्या घटनेतून सुहास जाधव याने मुलगा शिवांश आणि मुलगी श्रेया हिला हिंगणी येथील शेतातील विहिरीत ढकलून देऊन पोटच्या दोन मुलांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर सुहास जाधव याने स्वत: फोनवरून या घटनेची माहिती आपल्या घरी दिली. त्यानंतर सुहास जाधव याने पश्चात्ताप झाल्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

सुहास जाधव यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मुलांची हत्या कोणत्या कारणाने केली याचा तपास आता पोलिस करत आहेत. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून दोन चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR