30.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeराष्ट्रीयतीन मेड इन इंडिया शस्त्र पाकवर तुटून पडली

तीन मेड इन इंडिया शस्त्र पाकवर तुटून पडली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने मागच्या काही वर्षात संरक्षण क्षेत्रात स्वदेशी टेक्नोलॉजीच्या विकासात अभूतपूर्व प्रगती केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), भारत डायनेमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसारख्या संस्थांनी जागतिक स्तरावरची शस्त्रास्त्र प्रणाली विकसित केली. या शस्त्रास्त्रांनी फक्त भारताचीच सुरक्षा व्यवस्था मजबूत केली नाही तर शेजारच्या पाकिस्तानसाठीसुद्धा ही शस्त्र धोकादायक बनली. तीन दिवस चाललेल्या लढाईत एस-४०० च नाही तर मेड इन इंडियाच्या ३ शस्त्रांनी पाकिस्तानची वाट लावली. यामध्ये आकाश, ब्रम्होस आणि स्काय स्ट्रायकरचा समावेश आहे.

आकाश ही भारताची स्वदेशी बनावटीची जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आकाश एअर डिफेन्स सिस्टिम विकसित केली. याची रेंज ४५ ते ७० कि.मी. आहे. फाइटर जेट्स, ड्रोन, क्रूज मिसाइल आणि बॅलेस्टिक मिसाइल्स हे या क्षेपणास्त्राचे लक्ष्य असते. रडार-आधारित कमांड गाइडेंस आणि एक्टिव्ह रडार होमिंगद्वारे मार्गदर्शन असते. यामध्ये ६० किलो ग्रॅम एवढे उच्च दर्जाची स्फोटके असतात. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राची अचुकता ९० ते १०० टक्के आहे. हे क्षेपणास्त्र मोबाईल लॉंचर, टँक आणि ट्रॅकवर तैनात केले जाते. हे क्षेपणास्त्र शत्रूची जॅमिंग आणि इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप निष्क्रिय करण्यास सक्षम आहे. यामध्ये ९६ टक्क्यांवर स्वदेशी घटक आहेत. त्यामुळे आकाश हे मेड इंडिया उत्पादन म्हणून ओळखले जाते.

भारत-पाकिस्तान युद्धात आकाशने ९ मे रोजी पाकिस्तानचे फतेह-१ हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. पाकचे क्षेपणास्त्र आकाशच्या टप्प्यात येताच त्याला ट्रॅक करून इंटरसेप्ट करण्यात आले. आकाशने पाकचे ड्रोन आणि ड्रोन स्वार्म्सला निष्प्रभावी केले. या माध्यमातून पाकिस्तान श्रीनगर, बारामुल्ला आणि भुज येथे हल्ल्याचा प्रयत्न करत होते. आकाशने ते प्रयत्न हाणून पाडले. आकाशची ईसीसीएम क्षमता आणि रडार अचूकता महत्त्वपूर्ण आहे. यासोबतच पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकचे क्षेपणास्त्र हल्ले आकाशने हवेतच नष्ट केले.

यासोबतच या लढाईत ब्रम्होसची कामगिरी महत्त्वपूर्ण राहिली. सुपरसॉनिक ब्रम्होस क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९० किलोमीटर आहे. याच्या अ‍ॅडव्हान्स व्हर्जनची रेंज ५०० ते ८०० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र २०० ते ३०० किलोग्रॅम स्फोटके घेऊन जाण्यास सक्षम आहे. सोबतच हे क्षेपणास्त्र शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देऊन टार्गेट उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. ब्रम्होसद्वारे पाकिस्तानातील एअरबेस उडविण्यात आले.

स्काय स्ट्रायकर ड्रोनचा पाकला दणका
भारताचे स्काय स्ट्रायकर ड्रोन एक स्वायत्त लॉइटरिंग म्युनिशन आहे. भारत आणि इस्रायलने संयुक्तरित्या हे ड्रोन विकसित केले. हे ड्रोन आपली अचूकता आणि ‘लॉन्च एंड फॉरगेट’ टेक्नोलॉजीवर आधारित आहे. टार्गेट एरियामध्ये स्काय स्ट्रायकर बराचवेळ घिरट्या घालू शकते आणि लक्ष्य हेरुन अचूकतेने हल्ला करू शकते. हे ड्रोन ५ ते १० किलोग्रॅम स्फोटके पेलोड वाहून नेऊ शकते. छोट्या लक्ष्यांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरते. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरमध्ये स्काय स्ट्रायकर ड्रोनने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे ड्रोन रडारला सापडत नाही. त्यामुळे ते प्रभावी ठरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR