जळकोट : प्रतिनिधी
लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या काळात राजकीय आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडला आहे. यानिमित्ताने मतदारसंघातील प्रश्न, राज्य पातळीवरील प्रश्न, राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न चर्चिले जात आहेत. शेतक-यांचे प्रश्न, कष्टक-यांचे प्रश्न, बेरोजगार तरुणांच्या समस्या, नोकरीच्या संधी याबाबत चर्चा झाली. अर्थिक वृद्धी, दरडोई उत्पन्न, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक वावींवर या प्रचारात चर्चा झाली.
मतांची विभागणी कशी होणार कुठला उमेदवार कुठल्या भागात किती मताधिक्य घेणार, गावात अधिक मताधिक्य कुणाला मिळणार, याबाबत गणिते मांडली जात आहेत कोणते कार्यकर्ते सक्रीय आणि कोणते निष्क्रीय, कोणी कोणाचा प्रचार केला, याबाबत चर्चा सुरु आहे. निवडणूक होऊन ३ दिवस लोटले. मतमोजणीसाठी अजून जवळपास २४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राज्यात नेत्याचे होत असलेल्या जाहीर सभा, त्यातील आरोप प्रत्यारोप विविध प्रकारच्या घडामोडी ठळकपणे चर्चिले जात आहेत. मागील १० दिवसांपासून वाढत्या तापमानाने कहर केला असून सूर्यदेवता अक्षरश: आग ओकत आहे. वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जय पराजयाची राजकीय चर्चा रावागावात, वाडी- तांडावर सुरू झाली आहे. लग्नसोहळे, साक्ष गंध सोहळा, अंत्यसंस्कार, बास्तुशांती, मंदिरावरील महाप्रसाद था कार्यक्रमातही सर्वत्र राजकीय फिव्हर दिसून येत आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकडे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहीले जात असून त्यामुळे निवडणूक लढवू इच्छीत मंडळींनी उन्हाची तमा न करता अंग झोकून निवडणुकीच्या कामाला गती दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत विकास मुद्यांऐवजी जातीय समीकरणे प्रबळ ठरल्याची चर्चा जोमाने होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्र निहाय जातीय समिकरणे प्रबळगणे मांडताना दिसून येत आहे.
सध्या विविध रुग्णालयामध्ये उष्माघाताचे रुग्ण उपचार घेत असून तेही राजकीय चर्चेत सहभागी होत आहेत. कौटूबिक चर्चा होत नाही परंतु कोण विजयी होणार यावर चर्चा सुरु आहे. मोबाईलवर एकमेकांचे सुख दुख न विचारता थेट राजकीय तावरणाबाबत चर्चा सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर जातनिहाय कोणत्या उमेदवाराला किती मतदान मिळणार याची गोळा बेरीज टाकली जात आहे आपला उमेदवार कसा वरचढ राहील आपला उमेदवार कसा विजय होईल याचा आकडाच उमेदवारांचे समर्थक सोशल मीडियावर टाकत आहेत तर विविध मराठी वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचे आकडेही सोशल मीडियावर टाकले जात आहेत.