नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मध्य-पूर्वेकडील तणावाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत्या तेलाच्या किंमतीने जागतिक बाजारपेठ त्रासली आहे. अशात भारत जगातील सगळ््यात मोठ्या तेल आयातदार देशांतील एक प्रमुख देश आहे. भारताच्या तेलाच्या गरजेपैकी ८५ ते ९० टक्के साठा परदेशातून आयात केला जात आहे. एकंदरीत तेलाच्या बाबतीत भारत मोठ्या प्रमाणात इतर देशांवर अवलंबून आहे. त्यातच जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने आयात तेवढीच मात्र, एप्रिल ते ऑगस्टदरम्यान भारताला बिलाच्या रूपात ४८ टक्के वाढीव रक्कम मोजावी लागत आहे. याचाच अर्थ भारताला वाढीव भुर्दंड भरावा लागत आहे.
एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या ५ महिन्यांच्या कालावधीत भारताने सुमारे १००.७ दशलक्ष टन कच्चे तेल परदेशातून आयात केले होते. गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील भारताची कच्च्या तेलाची आयात १०१.१ दशलक्ष टन राहिली. एकंदरीत यंदाच्या वर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत भारताने गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ०.४ दशलक्ष टन तेल कमी आयात केले.
जेव्हा एखादा देश परदेशातून आयात करतो, तेव्हा त्या व्यवहारातील देय रकमेचे अधिकृत बिल म्हणजे आयात बिल. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यानचे दोन्ही वर्षांची आयात पाहता यंदा भारताने कच्च्या तेलाची आयात कमी केली आहे. तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदाचे आयात बिल सुमारे ४८ टक्क्यांनी वाढले आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत भारताचे आयात बिल ५०.५ अब्ज डॉलर इतके होते. २०२६ मध्ये याच कालावधीत भारताच्या आयात बिलात ४८ टक्क्यांची वाढ होऊन ते ७४.८ अब्ज डॉलर इतके झाले.
अमेरिका-इराण यांच्यात अजूनही तणाव असून, युद्धाचा भडका उडालेला आहे. त्यातच अमेरिका आणि इराणही मागे हटायला तयार नाहीत. त्यामुळे मध्य-पूर्वेत अजूनही तणाव कायम असून, असाच तणाव राहिल्यास कच्च्या तेलाचे दर आणखी भडकू शकतात. त्याचा सर्वांत जास्त फटका भारताला बसू शकतो. त्यामुळे भारतावर बिलाचा अतिरिक्त बोजा वाढण्याची चिन्हे आहेत. यातून पुन्हा इंधन दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही.
कच्च्या तेलाच्या
दरवाढीचा फटका
एप्रिल ते ऑगस्ट दरम्यानचा विचार करता जरी आयात गेल्या वर्षाच्या तुलनेने जवळपास सारखीच असली तरी आयातीचे बिल ४८ टक्क्यांनी वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती. इराण-अमेरिका युद्धामुळे जगभरातील तेल वाहतुकीचे प्रमुख मार्ग सध्या दबावाखाली आहेत. या तणावपूर्ण वातावरणामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढत चालल्या आहेत. किंमती वाढल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदाच्या वर्षी भारताला प्रतिबॅरल जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
ऑगस्टच्या आयात
बिलात १८ टक्के वाढ
ऑगस्ट २०२५ चा विचार केला तर भारताने एकूण १९.६ दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली होती तर त्यामागे ९.९ अब्ज डॉलर खर्च केले होते. परंतु ऑगस्ट २०२६ मध्ये भारताने कच्च्या तेलाच्या आयातीत ३ टक्के घट झाली. या महिन्यांत भारताने सुमारे १९ दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली. पण या आयातीमागे भारताला एकूण ११.७ अब्ज डॉलर मोजावे लागले. म्हणजेच गेल्या वर्षाच्या ऑगस्टच्या तुलनेने यंदाच्या ऑगस्टमध्ये ३ टक्के आयात कमी करूनही १८ टक्के जास्त पैसे दिले.
















