शेतक-यांचा आर्त टाहो, अनेकांनी फोडला हंबरडा
सरकारने पाहणी न करता दुष्काळ जाहीर करावा : रोहित पवार
सरकारला दिवस-रात्र सळो की पळो करून सोडणार : दानवे
मुंबई : प्रतिनिधी
दीड-पावणेदोन महिने झाले, पावसाचा पत्ता नाही. ऐन गरजेच्या वेळी पाऊस गायब झाल्याने मराठवाडा, विदर्भातील शेतपिके करपून गेली. शेतशिवारात अक्षरश: पिकांचा धुरळा झाला. जिथे पिके आहेत, त्याला लागण नाही. त्यामुळे शेतपिकांची भीषण स्थिती असून, येत्या काळात जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता माय-बाप सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि शेतक-यांना तातडीने मदत करावी, अशी आर्त हाक दिली जात असून, ही भीषण स्थिती पाहता अनेक शेतक-यांनी पाहणी दौ-यात अक्षरश: हंबरडा फोडला. परंतु सरकार ५ ऑक्टोबरच्याच मुहूर्ताची वाट पाहात आहे. यावर आ. रोहित पवार यांनी शेतीत पाहण्यासारखे काहीच राहिले नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, असे म्हटले तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिवसाच नव्हे तर रात्रीही सळो की पळो करून सोडावे लागेल, असा इशारा दिला.
यंदाच्या पावसाळ््यात राज्यातील काही भागांतच दमदार पाऊस झाला. परंतु मराठवाडा, विदर्भात सुरुवातीला जेमतेम पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिके बहरली. परंतु ऐनवेळी पाऊस गायब झाल्याने संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला आहे. गेल्या ५२ दिवसांपासून मराठवाडा, विदर्भात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिके जागेवरच करपली आहेत आणि जी पिके उभी आहेत, त्याला लागणच नाही. संपूर्ण खरीप हंगामच आता हातातून गेला आहे. त्यामुळे शेतकरी अभूतपूर्व संकटात सापडला आहे. अशा स्थितीत शेतक-यांना तातडीने मदत दिली पाहिजे. यासाठी शेतकरी टाहो फोडत आहे. तसेच विरोधी पक्षांचे नेतेही पिकांची पाहणी करून मदतीची मागणी करीत आहेत. याशिवाय सत्ताधारी नेते, कृषिमंत्रीही बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत. परंतु प्रत्यक्षात अद्याप शेतक-यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष वाढला आहे.
दरम्यान, याच मुद्यावरून आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर आक्रमक भूमिका घेतली असून, तीव्र संताप व्यक्त करीत मराठवाडा, विदर्भात दुष्काळाची परिस्थिती असताना तिकडे कोण पाहतंय? एकीकडे कर्नाटक १३० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करतंय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुहूर्त पाहात बसले आहेत. या विषयावर सरकारला सडेतोड उत्तर द्यायला हवे. केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीही उठता-बसता सरकारवर तोफ डागावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
पळ काढू देणार नाही
माझ्या माहितीप्रमाणे ५२-५३ दिवसांपासून पाऊस नाही. पूर्वी २१ दिवसानंतर विमा मिळत होता. आता ५२ दिवसांपासून पाऊस नाही. एवढे दिवस पाऊस नाही. मग कोणते पीक जिवंत राहणार? कोरडवाहू पीक करपले. बागायती पिकाला वीज मिळात नाही. त्यामुळे तेही पीक जळून गेले. मग ५ ऑक्टोबरची वाट का बघता? सरकार प्रश्नातून पळ काढत आहे. पण आम्ही पळ काढू देणार नाही, असा इशारा दानवे यांनी दिला.
सरकार दुष्काळ जाहीर
करू शकते : शिरसाट
राज्यात पावसाने दडी मारली आहे. मराठवाडा, विदर्भात भीषण दुष्काळी स्थिती आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे राज्यात पीक स्थिती समजून घेत आहेत. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून भरीव मदत करावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. विरोधकही आक्रमक झाले आहेत. यावर आता मंत्री संजय शिरसाट यांनी लवकरच राज्य सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकते, असे म्हटले. सध्या शेतक-यांना भरीव मदत देणे गरजेचे आहे, असेही शिरसाट म्हणाले.
उद्योगपतींचे १० लाख कोटी
माफ, शेतकरी वा-यावर का?
२०१४ ते २०२६ या १२ वर्षांच्या काळात केंद्र सरकारने उद्योगपती आणि कॉर्पोरेट क्षेत्राचे तब्बल १० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याची सरकारी आकडेवारी समोर आली आहे. मात्र, शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी एक-एक रुपयाचा विचार केला जात आहे. हे धक्कादायक वास्तव समोर आल्याने सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एवढा भीषण दुष्काळ
आयुष्यात पाहिला नाही
पिकांची जी भीषण स्थिती आहे ना, ती पाहता एवढा भीषण दुष्काळ मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. सोयाबीन, कापसाचे सर्वांत मोठे नुकसान झाले आहे. उसाचीही हानी झाली. या दुष्काळाच्या मदतीसाठी एक प्रक्रिया आहे, नियमावली आहे. त्यानुसार एनडीआरएफप्रमाणे शेतक-यांना मदत दिली जाणार आहे. एवढेच नव्हे तर लवकरच दुष्काळही जाहीर होणार आहे, असे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.
















