मुंबई : प्रतिनिधी
दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुराणा आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ तसेच हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या ‘एक दीवाने की दीवानियत’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही चित्रपटांनी पहिल्या आठवड्यात मोठी कमाई केली असून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘थामा’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार सुरुवात केली होती. आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाची एकूण कमाई जवळपास ९० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. रविवारी या चित्रपटाने ४ कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाची एकूण कमाई ९५.५५ कोटी झाली आहे.
दुसरीकडे, ‘एक दीवाने की दीवानियत’ या हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या रोमँटिक ड्रामानेही पहिल्या आठवड्यात समाधानकारक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने एकूण ५२ कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाची कमाई अनुक्रमे ९ कोटी, ७.७५ कोटी आणि ६ कोटी इतकी होती. तर, सोमवारी या चित्रपटाने ४ कोटींची कमाई केली.
दोन्ही चित्रपटांमध्ये पहिल्या दोन दिवसांत थोडी घट दिसली असली, तरी वीकेंडला पुन्हा कमाई वाढली. ‘थामा’ला अधिक स्क्रीन आणि प्रेक्षकवर्गाचा फायदा झाला, तर ‘एक दीवाने की दीवानियत’ने मर्यादित प्रदर्शनातही चांगला व्यवसाय केला आहे.

