सोलापूर : लोकसभा – निवडणूक तोंडावर असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर विधानसभेच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला असून त्यासंबंधीचे पत्र त्यांनी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात त्यांचे बंधू सुरेश हसापुरे यांचे नाव आघाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोलापूर मतदारसंघात कोणता उमेदवार भाजपचा पराभव करू शकेल, याचा अंदाज घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर मध्य, शहर उत्तर, मोहोळ व पंढरपूर- मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचाही विचार करावा लागणार आहे. सध्यातरी काँग्रेसकडून आमदार प्रणिती शींदे यांचेच नाव आघाडीवर आहे. लोकसभेचा उमेदवार फायनल करताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार निश्चित करावा लागतो.
त्या नेत्यांची मदत लोकसभा निवडणुकीत होते, असे राजकीय समीकरण असते. काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या तालुका तथा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून माढा लोकसभा मतदारसंघही राष्ट्रवादीकडेच आहे. त्यामुळे सुरवातीला धवलसिंहांनी पक्ष संघटन मजबूत करण्याची मोहीम दक्षिण सोलापुरातूनच केली होती. मात्र, कालांतराने त्यांनी बाहेर फिरणे कमी केले. पक्षातील स्थानिक पातळीवरील वरिष्ठ नेते सहकार्य करीत नसल्याची खंत त्यांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत पक्षाच्या जिल्हा संघटकांनीच धवलसिंहांना दक्षिण सोलापुरातून संधी दिल्यास निश्चितपणे काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वास पत्रातून व्यक्त केला आहे.