पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरीत कार्तिकी यात्रेत लाखो भाविकांसाठी गेली १७ दिवस २४ तास उभे असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा शिणवटा आज काढण्यात आला. अर्थात मंदिरात कार्तिकी यात्रेनिमित्त सुरू असलेले २४ तास दर्शन आजपासून बंद करण्यात आले. यासोबतच देवाचे नित्योपचार आणि राजोपचार पुन्हा सुरू करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून २४ तास दर्शनासाठी उभ्या असणा-या विठुरायाला आजपासून रोजची निद्रादेखील मिळणार आहे.
कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा आहे. विठुरायाला गरम पाणी व दह्या-दुधाने स्नान घालण्यात आले आणि आयुर्वेदिक काढाही देण्यात आला. यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आले, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. या प्रक्षाळ पूजेनंतर देवाला आराम मिळतो. या विशेष प्रसंगी पुणे येथील एक भाविक अमोल शेरे यांनी संपूर्ण विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला अत्यंत आकर्षक आणि सुंदर फुलांची आरास केली. यात्रेच्या सांगतेनंतर मंदिरातील धार्मिक विधी पूर्ववत सुरू झाले आहेत.
कार्तिकी यात्रेत लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी विठुराया अहोरात्र उभा होता. यात्रा सुरू झाल्यावर सलग १७ दिवस मंदिरात २४ तास दर्शन सुरू असते. या काळात विठ्ठलाला थकवा येऊ नये, म्हणून पाठीला लोड लावण्यात आला होता. या काळात देवाचे सर्व नित्योपचार बंद होते. ते आज पूर्ववत सुरू करण्यात आले. अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजेची परंपरा आहे. यासाठी आज दुपारपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर देवाच्या पायाला चोळून दर्शन घेत होते. यामुळे थकलेल्या पायाच्या शिरा मोकळ््या होतात, अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळे ही परंपरा पाळण्यात येते.
यानंतर देवाला स्नान घालण्यात आले. त्यानंतर पोशाखासह दागिने, अलंकारांनी सजविण्यात आले. विठुरायांसोबतच रुक्मिणीमातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा, पुतळ््यांच्या माळा, पुतळ््याची माळ अशा पारंपरिक दागिन्यांनी सजविण्यात आले. देवाचा शिणवटा घालविण्यासाठी रात्री गवती चहासह विविध प्रकारचे १५ ते १६ आयुर्वेदिक पदार्थांचा काढा झोपण्यापूर्वी दिला गेला. या पूजेनंतर देवाचे नित्योपचार पुन्हा सुरू झाले. या निमित्ताने भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी आणि या पारंपरिक विधीसाठी मोठी गर्दी केली होती. विठुरायाच्या जयघोषात हे विधी पार पडले.
जयघोषात देवाला दुधाचा अभिषेक
यानंतर ब्रम्हवृंदाच्या रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह प्राप्त होत असल्याची भावना वारकरी सांप्रदायात आहे. देवाला स्नान घातल्यानंतर सुंदर असा पोशाख घालण्यात आला. तसेच हिरे-माणिकाच्या दागिन्यांनी सजविण्यात आले.
पोशाखासह अलंकारांमुळे विठुरायाचे सौंदर्य खुलले
मस्तकी सुवर्ण मुकूट, गळ््यात अनमोल कौस्तुभ मणी, भाळी निळ््या हि-यांचा नाम, दंडाला दंड पेट्या आणि गळ््यात अत्यंत मौल्यवान मोहरांची माळ, पुतळ््यांची माळ, तीन पदरी सुवर्ण तुळसमाळ, कानाला हिरेजडीत मत्स्य जोड अशा अलंकारांनी विठुरायाला सजविण्यात आले. अलंकारांसोबत आकर्षक पोशाखही परिधान केल्याने विठुरायाचे सौंदर्य अतिशय खुलून दिसले.

