जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातात उत्पन्न आले नसल्याने त्याचा थेट परिणाम शेतमजूर वर्गावर होत आहे. शेतात कामे नसल्याने मजुरांच्या हाताला रोजगार मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, तालुक्यातील मजूर वर्ग आता रोजगाराच्या शोधात गाव सोडून दुस-या जिल्ह्यात किंवा परराज्यात स्थलांतर करण्याच्या तयारीत आहे. दिवाळीचा सण संपताच अनेक कुटुंबे रोजगारासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
शेतक-यांचेच आर्थिक गणित कोलमडल्याने शेतमजुरांनाही कामे मिळेनाशी झाली आहेत. पेरणी, निंदणी, खुरपणी आणि काढणी यांसारख्या कामांतून मिळणारा रोजगार कमी झाला आहे. त्यामुळे रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर आता घरखर्च, मुलांचे शिक्षण, किराणा आणि इतर दैनंदिन गरजा भागविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला, तरी यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक मजूर कुटुंबांच्या चेह-यावर चिंतेचे सावट आहे. सण साजरा करण्यासाठीही पैशांची जुळवाजुळव करावी लागत असताना दिवाळीनंतर पुढील दिवस कसे काढायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे सुरू झाल्यास मजुरांना आपल्या गावातच काम मिळू शकते. त्यामुळे रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, जळकोट तालुक्यात अद्याप रोजगाराची कामे सुरू झालेली नसल्याने मजूर वर्गाला कामासाठी प्रतीक्षा करावी लागत
आहे.
















