प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.रविंद्र खंदारे यांची माहिती
कळंब : धाराशिव जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी कर्णबधीर, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग इतर प्रकारचे आजार असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून जिल्हा अंतर्गत बदली करून घेतली होती. बदली करून घेतलेल्या शिक्षकांची उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करून आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी तक्रार कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी केली होती. तक्रारीवरून जिल्हाशल्य चिकित्सक धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
जिल्हाशल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने एकूण १०० शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्र/दुर्धर आजाराने पीडित कर्मचारी यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी केली. तपासणीनंतर १०० पैकी एकूण २१ शिक्षकांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात त्रुटी असल्याचे शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद धाराशिव विभागास कळविण्यात आले होते. त्रुटी आढळलेल्या २१ शिक्षकांची विभागीय चौकशी सुरू असून विभागीय चौकशीअंती पुढील कार्यवाही अनुसरण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. रविंद्र खंदारे यांनी लेखी पत्राद्वारे तक्रारदार तसेच कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांना कळविले आहे.
















