नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशातील सर्व शाळांमध्ये तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि संगणकीय अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. यासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत अभ्यासक्रमाचे साहित्य, हँडबुक आणि डिजिटल संसाधने तयार केली जाणार आहेत. एआय आणि संगणकीय अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली.
राष्ट्रीय शालेय शिक्षण आराखडा २०२३ नुसार अर्थपूर्ण आणि समावेशक अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह सीबीएसई, एनसीईआरटी, केव्हीएस आणि एनव्हीएससारख्या संस्थांना केंद्रीय शिक्षण मंत्रालय सहकार्य करत आहे.
यासाठीचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या तयारीसाठी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी बैठक घेण्यात आली. यावेळी सीबीएसई, एनसीईआरटी, केव्हीएस, एनव्हीएस आणि इतर तज्ज्ञ उपस्थित होते. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) एआय आणि सीटी अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी आयआयटी मद्रासचे प्रा. कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय ज्ञान प्रशिक्षणाच्या माध्यमातून हळूहळू सार्वजनिक हितासाठी एआयचा वापर वाढवण्याचा उद्देश या संकल्पनेमागे आहे. शिवाय एआयमधील गुंतागुंतीच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी तसेच एआयच्या नैतिक वापराच्या दिशेने टाकलेले एक नवीन परंतु महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कारण या तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुरुवात इयत्ता तिसरीपासून होईल, असे शिक्षण मंत्रालयाने म्हटले.

