22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसंपादकीय विशेषदेशापल्याडचे गणराया

देशापल्याडचे गणराया

आपल्या संस्कृतीमध्ये गणपती हे आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना ती गणेश पूजनाने होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा तर महाराष्ट्राच्या लोकोत्सवातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जगभरात स्थायिक झालेले मराठी जन गणेशोत्सव साजरा करत असतात. पण त्यापूर्वीपासून अगदी प्राचीन काळापासून जपान, जावा, कंबोडिया, थायलंड, नेपाळ, चीन, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये गणपतीची पूजा केली जात असे. ब्राझीलसारख्या देशामध्ये तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. या बहुतेक देशांमध्ये आजही गणेश पूजनाची परंपरा आहे.

कोणत्याही कामाची सुरुवात आपल्याकडे नेहमीच गणेशपूजनाने केली जाते. मग ते इमारतीचा पायाभरणी समारंभ असो, घरगुती कार्यक्रम, सण समारंभ असो किंवा सांस्कृतिक समारंभ असो. अग्रपूजेचा मान हा नेहमी श्री गणेशालाच दिला जातो. मात्र अनेक परदेशांतही गणेशपूजन केले जाते. त्यांपैकी काही देशांत पूर्वापार ही प्रथा आहे; तर काही देशांत आपल्याकडून ही प्रथा घेतली गेली आहे. इकडून तिकडे गेलेले राजे, महाराजे, ऋषी, व्यापारी इत्यादींकडून ही प्रथा अनेक ठिकाणी पोहोचल्याचे मानले जाते.

सम्राट अशोकाच्या कन्येने नेपाळची सध्याची राजधानी असलेल्या काठमांडू येथे गणेश मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. नेपाळमध्ये पूर्वीपासूनच गणेशपूजन केले जात होते. तिथे गणेशाला ‘सूर्य विनायक’ या नावानेही ओळखले जाते. तिथे विघ्न विनाशक देवता म्हणून गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो. नेपाळप्रमाणेच तिबेटमध्येही भारतीय संस्कृती पसरलेली होती. तिथेही याच प्रकारे गणेशपूजन केले जाते. तेथील प्राचीन मठांमध्ये गणेशाच्या पूजनाची परंपरा आहे. नवव्या शताब्दीच्या पूर्वार्धात तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशपूजन सुरू झाले. भूत, पिशाच्च आणि दुष्ट शक्तींचा विनाशकर्ता म्हणून तिथे गणेशाची ओळख आहे. त्यामुळेच घरांच्या आणि मंदिरांच्या दरवाजांवर गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. तिबेटवर चीनचे नियंत्रण आल्यानंतर तेथील काही धार्मिक परंपरांना धक्का बसला. त्याप्रमाणे या परंपरेवरही त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला. परंतु तरीही ही प्रथा अजूनही सुरू आहे. म्यानमारमध्येही गणेशपूजन केले जाते. तेथील बौद्ध मंदिरांतही गणेशमूर्ती आढळतात.
जावामध्ये सापडलेली गणेशमूर्ती आज लंडनच्या वस्तुसंग्रहालयात ठेवली गेली आहे. इंडोनेशियातील हिंदू लोकही गणेशाची पूजा करतात. बाली द्वीपावर राजा-राणीच्या मूर्ती बनवल्यानंतर त्या मूर्तींच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती प्रस्थापित केली जात असे. श्रीलंकेत कोलंबोपासून सुमारे दोनशे किलोमीटरवर असलेल्या कदरगाम येथे गणेशाचे भव्य मंदिर आहे. बोर्नियोमध्ये गणेशपूजनाची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे.

कंबोडिया आणि थायलंडमध्येही गणेशपूजनाची प्राचीन परंपरा आहे. कंबोडियाची प्राचीन राजधानी अंगारकोट येथे तर गणेशमूर्तींचा खजिनाच सापडला आहे. विविध प्रकारच्या रंग-रूपात तिथे गणेशमूर्ती सापडल्या आहेत. ‘प्राहाकनैत’ या नावाने कंबोडियात गणेशपूजा केली जाते. हातात पुस्तक घेऊन बसलेल्या गणपतीची तेराव्या शतकातील प्राचीन मूर्ती इथे आढळते. त्यात गणेशाने कंबोडियन मुकुट घातला आहे. मंगोलियात गणेशाच्या आकाराशी मिळताजुळता आकार असलेल्या एका देवतेची पूजा केली जाते. चीनमध्ये गणेशाला ‘कुआन शी तिएन’ या नावाने ओळखले जाते. तिथे कांतिगेन या नावानेही गणेशाला ओळखले जाते. जपानमध्ये सहसा गणेशाला ‘कातिगेन’ या नावाने ओळखले जाते. येथील मूर्तींना दोन किंवा चार हात असतात. सन ८०४ मध्ये जपानमधील कोबोदाईशी हा धर्माच्या शोधार्थ चीनमध्ये गेला. तिथे त्याला वज्रबोधी आणि अमोघध्वज या विद्वानांच्या ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद करण्याची संधी मिळाली. त्याने चीनमधील मंत्रप्रणालीमध्ये गणेशाच्या महिम्याचे वर्णन केले. चीनची तत्कालीन राजधानी लोयांग येथे सन ७२० मध्ये मूळ भारतीय वंशाचा असलेला अमोघध्वज गेला. चीनच्या कुआंग फू मंदिरात त्याची पुजारी म्हणून नियुक्ती केली गेली.

त्यानंतर हुई कुओ या धर्मपरायण व्यक्तीने त्याच्याकडून सर्वप्रथम धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर त्याने कोषो दाइशीला दीक्षा दिली. कोषो दाइशीने चीनमधील विविध मठांमधून संस्कृत ग्रंथ गोळा केले. सन ८०६ मध्ये तो जपानमध्ये परतला त्यावेळी आपल्याबरोबर वज्र धातूच्या महत्त्वपूर्ण सूत्रांबरोबरच तो गणेशाचे चित्रही घेऊन गेला. सुख, समृद्धीसाठी म्हणून या चित्राची पूजा केली जाऊ लागली. जपानमधील कोयसान संतसुजी विहारात चार ओळीत गणेशाची चित्रे मांडण्यात आली आहेत. त्यात युग्म गणेश, षड्भुज गणेश, चतुर्भुज गणेश आणि सुवर्ण गणेश ही प्रमुख चित्रे आहेत. कालांतराने गणेशाच्या पाच रूपांचे जपानमध्ये पूजन केले जाऊ लागले. कोंगो जाई तेन हे पहिले रूप होय. यालाच छत्र विनायक असे म्हणतात. गणेशाच्या दुस-या रूपाला कोंगो जिक तेन किंवा माल्य विनायक असे म्हणतात. तसीरा कांती गेन किंवा भाग्य विनायक हा तिसरा गणपती होय. गेंगो एतेन हा चौथा गणपती. यालाच धनुर्विनायक या नावानेही ओळखले जाते. जेबु कुतेन हा पाचवा गणपती म्हणजे खङ्ग विनायक होय. जपानमध्ये सर्वसामान्यपणे गणेशपूजन केले जाते. तक ओं के जिंगोजी नावाचे येथील गुहेतील मंदिर प्रसिद्ध आहे. तिथे दरवर्षी गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते.

बोर्नियोमध्ये काचेत घडवलेली गणेशाची सुंदर मूर्ती सापडली आहे. चीनच्या तून हू आग येथील सन ६४४ मध्ये एका पहाडावर गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्याखाली चिनी भाषेत लिहिले आहे की हा हत्तींचा राजा आहे. चीनमध्ये उभ्या राहून एकमेकांना आलिंगन देणा-या दोन गणेशांची मूर्ती आढळते. म्यानमारमध्ये गणपतीला महापिनी, नेपाळमध्ये हेरंब विनायक, मंगोलियात घोटाकर आणि तिबेटमध्ये सोकापरक या नावाने ओळखले जाते. जावामध्ये गणपतीला कालांतक म्हणतात. येथील चंडिबनोन नावाच्या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाबरोबरच गणपतीची मूर्तीही आहे. इंडोनेशियात गणपतीला बोरोगणेश म्हणतात. येथील गणपतीचे मस्तक खूपच मोठे असून तो सोंडेने प्रसाद खात आहे. अफगाणिस्तानात कुशाणपूर्व काळापासून गणेशपूजेची प्रथा होती. पश्चिम इराणमधील लुरिस्तान येथे करण्यात आलेल्या उत्खननात इ. स. पू. १२०० ते १००० या काळातील गणेशमूर्ती सापडल्या आहेत. अहुरमज्दा या नावाने इराणी लोक गणेशाची पूजा करतात. इराणमधील गणपती खङ्गयोद्धा स्वरूपाचा असून तो नावाप्रमाणेच योद्धा आहे.

भारतापासून दूरवर असलेल्या देशांचा विचार करता ग्रीसमध्ये ओरेनस नावाच्या देवाची पूजा केली जाते. त्याचे स्वरूप ब-याच अंशी गणेशाच्या स्वरूपाशी जुळणारे आहे. ईजिप्तचा इतिहासकार हर्मिज याच्या मते ओरेनस हा सर्व देवांच्या आधी पूजला जाणारा देव आहे. तो बुद्धीचा देव असून त्याचे नाव एकहोन आहे. एकदंत या नावाशी या नावाचे साम्य आढळते. त्यामुळे हे गणेशाचेच वर्णन असावे असे मानले जाते. अरुणास्य हे सिंदूरवदन गणेशाचे एक नाव आहे. त्याचाच अपभ्रंश होऊन ओरेनस हे नाव तयार झाले असावे असे मानले जाते. ब्राझीलमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. मस्तक हत्तीचे आणि शरीर माणसाचे अशा प्रकारच्या देवतेचे मेक्सिकोतील लोक आजही पूजन करतात. बुद्धीची रोमन देवता जेनस हिलासुद्धा हत्तीचे मस्तक असते. ती गणेशाच्या समकालीन मानली जाते. तिचे पूजनही मंगळवारीच केले जाते.

अठराव्या शतकातील संस्कृतचे प्रकांड पंडित विल्यम जोन्स यांनी जेनस आणि गणेश यांची तुलना करून असा निष्कर्ष काढला आहे की गणेश आणि जेनस यांच्यात कमालीचे साम्य आढळते. गणेशाची सर्व वैशिष्ट्ये जेनसमध्येही आढळतात. रोमन आणि संस्कृत शब्दांच्या उच्चारांतही साम्य आढळते. जेनस आणि गणेश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हनोई येथे विघ्नेश्वर असे गणपतीचे नाव असून तो कमळात बसलेला असतो. ‘गणेश-अ मोनोग्राफ ऑफ द एलिफंट फेस्ड गॉड’नुसार, जगाच्या कित्येक भागांत गणेशपूजनाची प्रथा सुरू होती आणि या मूर्तींच्या आकारांत आणि प्रकारांत विभिन्नता आढळते. जावातील गणेशमूर्ती मांडी घालून बसलेली आहे. तिचे दोन्ही पाय जमिनीला टेकलेले असून त्यांचे तळवे परस्परांना स्पर्श करत आहेत. आपल्याकडे गणेशाच्या मूर्तीची सोंड सहसा मध्यभागापासून डावीकडे किंवा उजवीकडे वळलेली असते. परंतु परदेशांतील मूर्तींमध्ये ती सरळ, सुरुवातीपासूनच वळलेली असते. प्राचीन काळात भारतीय संस्कृती दूरवर पसरलेली होती, हेच यावरून सिद्ध होते.

-अभय कुलकर्णी, मस्कत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR