धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखा व नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत १ कोटी ५ लाख ७८ हजार ८०० रूपये किंमतीचा ५२८.९४ किलो गांजा पकडला. स्कार्पियो चारचाकी गाडीतून गांजाची वाहतूक होत होती. ही कारवाई दि. ३१ जुलै रोजी उशिरा करण्यात आली. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी(तुळजापूर) निलेश देशमुख यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
३० जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या जातीय घटनेच्या अनुषंगाने नळदुर्ग बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, पोना ढगारे, पोलिस अंमलदार कोळी, आशमोड, चालक पोलीस अंमलदार भोसले व पोलिस ठाणे नळदुर्गचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, परि. पोउपनि नांगरे, सफौ गायकवाड, पोलिस अंमलदार फुलसुंदर, पोलिस अंमलदार जाधव, कुंभार, शिंदे, चालक सगर आदी नळदुर्ग येथे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक पांढ-या रंगाची स्कार्पिओ गाडीतून गांजाची वाहतूक होत आहे.
या माहितीवरून पोलिसांचे पथक नळदुर्ग बसस्थानक ते सोलापूरकडे जाणा-या रोडवर राजेबाग शहावली दर्गाच्या विरुध्द बाजूस पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकास एक पांढ-या रंगाची स्कार्पिओ संशयास्पदरित्या जाताना दिसली. यावेळी पथकाने सदर स्कार्पिओला थांबविले असता गाडीमध्ये एक व्यक्ती मिळून आला. पथकाने त्याचे नाव-गाव विचारले असता अतिष राजकुमार माने रा. हाऊसे वस्ती, अमराई जुना देगाव नाका सोलापूर असे सांिगतले. पथकाने गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीत गांजा आढळून आला. गाडीत ५२८.९४ किंलो वजनाचा गांजा सापडला. त्याची एकुण किंमत १ कोटी ५ लाख ७८ हजार ८०० रूपये आहे. यावेळी गांजासह स्कार्पिओ गाडी, मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपी अतिष राजकुमार माने यांच्या विरोधात पोलिस स्टेशन नळदुर्ग येथे विविध कलमासह एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नळदुर्ग पोलिसांच्या पथकाने केली.