सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील प्रत्येक घरावरती बारकोड प्लेट लावण्यात येत असून घंटागाडी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक दिवशी या बारकोड प्लेटला स्कॅन केल्यानंतरच कचरा गोळा करायचा आहे. घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील किती नगरांमधून अथवा व्यावसायिक अस्थापनांमधून कचरा संकलन केला गेला याची माहिती थेट महापालिकेस मिळण्यासाठी घरोघरी कचरा संकलनाचे क्यूआर कोड लावण्याचे काम युध्दपातळीवर चालू आहे.
तब्बल दोन लाख ४० हजार क्यूआर कोड लावले जाणार आहेत दोन दिवसांत तीन हजार ६५७ घरांवर हे क्यूआर कोड लावले गेले आहेत. शहरातील कचरा संकलनाचे खासगीकरण केले आहे. दररोज तीन साडेतिनशे टन कचरा उचला जात आहे. त्यावर मक्तेदारांचे बिल लावले जाते. मात्र, कचरा संकलनामध्ये सावळा गोंधळ आहे. संकलन केलेला कचरा आणि कचरा पेमेंटमध्ये असलेल्या नोंदीमध्ये तफावत असल्याने कचरा व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना वेळोवेळी राबविल्या जात आहेत याचाच एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन शहर स्वच्छतेच्या कामांच्या परिणामकारक व्यवस्थापनाकरिता राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिका तसेच सर्व नगरपरिषद, नगर पंचायतमध्ये या माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा आयटीसी बेस्ड वापर आवश्यक असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाची कंपनी आयटीआय लिमिटेडमार्फत एक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक मालमत्तेवर विशिष्ट प्रकारचे क्यूआर कोड व ओला व सुका कचरा डब्यांवर दोन क्यूआर कोड कंपनीमार्फत लावण्यात येतील.
क्यूआर कोड लावण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून दोन दिवस झाले चालू आहे. शहरात दोन लाख ५० हजार क्यूआर कोड लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. प्रभाग निहाय क्युआर कोड लावण्याचे काम चालू आहे. दोन दिवसांत तीन हजार ६५७ क्यू आर कोड लावले गेले आहेत. यासाठी ३५ टीम तयार केल्या आहेत.