लातूर : प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी १९३५ मध्ये ‘नदीजोड प्रकल्प’ ही दूरदृष्टी मांडली होती. देशातील पाण्याचे असमतोल वितरण दूर करून दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी विचार आजही अपूर्णच आहे. परिणामी, देशभरात अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाईची समस्या कायम आहे. दरम्यान, नदी जोड प्रकल्प कार्यान्वित करून या प्रकल्पला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद भेटला.
देशाच्या एका भागात सतत पूर परिस्थिती आणि काही भागात सतत दुष्काळ पडतो आहे. पाण्याचा समतोल नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हीच बाब लक्षात घेऊन लातूर येथील वसुंधरा प्रतिष्ठानने २०१६ पासून ‘नदीजोड प्रकल्प’ कार्यान्वित करण्यासाठी लोकचळवळ उभी केली आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत ५० हजारांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्ष-या गोळा करून पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच राज्याच्या मुख्यमंर्त्यांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या मोहिमेला अधिक गती देण्यात येत आहे. वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुन्हा व्यापक स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

