नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमध्ये वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे ही घटना घडली. आरोपीने वृद्ध महिलेवर आधी बलात्कार केला. त्यानंतर अमानुष मारहाण करत तिला संपवण्यात आले. या प्रकरणाचा ९ दिवसांनंतर उलगडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ९ दिवसांनंतर या हत्याकांडाची घटना समोर आली. घटनेचा तपास करून आरोपीला बेड्या ठोकण्यात सावनेर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. बलात्कार करून तिची हत्या करणा-या आरोपीला एलसीबीच्या पथकाने बोखारा येथून ताब्यात घेतले. तांत्रिक पुरावे आणि चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
गंगाबाई असे मृत महिलेच्या हातावर गोंदलेले नाव आहे. मात्र तिची वास्तविक ओळख अद्याप पटली नाही. सुधाकर बाबाराव मंडपे (४८ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. तो ब्राम्हणवाडा येथील रहिवासी आहे. सावनेर येथे बांधकाम कामगार म्हणून तो काम करत होता. २७ जूनच्या रात्री दहेगाव रंगारी येथील नागपूर-सावनेर महामार्गाच्या सर्व्हिस रोड परिसरात आरोपीने वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. अत्याचार करून आरोपीने वृद्ध महिलेला अमानुष मारहाण केली. ज्यामुळे पोटातील आतडे बाहेर आले होते.
















