25.4 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रनिकमांची ‘सरकारी’ नियुक्ती रद्द करा; विजय पालांडे याची मागणी

निकमांची ‘सरकारी’ नियुक्ती रद्द करा; विजय पालांडे याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारकडून उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण, त्यांच्या नियुक्तीलाच आता विरोध करण्यात आला आहे. निकम हे भाजपकडून निवडणूक लढले, त्यामुळे त्यांचा अजेंडा बदलला आहे, असे म्हणत त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी कोर्टात करण्यात आली आहे.
दरम्यान, नामांकित वकील असलेल्या उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. पराभूत झाल्यानंतर निकम यांची पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक हत्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या विजय पालांडे याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वकील उज्ज्वल निकम भाजपतर्फे निवडणूक लढले आहेत. त्यांची ओळख, विचार आणि अजेंडा बदलला आहे. आता ते भाजपचे नेते आहेत. माझ्या खटल्यात निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे, असे पालांडेंनी याचिकेत म्हटले आहे.

उज्ज्वल निकम कोणत्याही थराला जातील
पालांडेंनी याचिकेत असेही म्हटले आहे की, भाजप सरकारने निकम यांची नियुक्ती वाईट हेतूने केलेली आहे. त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा प्रचार निकम करतील. ते आता राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील. भाजपची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी ते हाय प्रोफाईल प्रकरणातील कथित आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून कोणत्याही थराला जातील. ते आरोपीच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल, असे पालांडेंनी म्हटले आहे.

निकम यांची नियुक्ती रद्द करा
आरोपींचे मूलभूत हक्क जपण्यासाठी निकम यांना आपल्या खटल्यापासून दूर ठेवण्यात यावे. त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी पालांडेंनी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर आता २८ जून रोजी सुनावणी होणार आहे.

निकमांचा १६ हजार मतांनी पराभव
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या उज्ज्वल निकमांचा १६ हजार ५१४ मतांनी पराभव झाला. निकम यांना ४ लाख २९ हजार ३१ मते मिळाली. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना ४ लाख ४५ हजार ५४५ मते मिळाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR