27.3 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरनिलंगा-उदगीर मोडवर झरी ग्रामस्थांचा रस्ता रोको

निलंगा-उदगीर मोडवर झरी ग्रामस्थांचा रस्ता रोको

निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील निलंगा उदगीर मोड वरील झरी येथे स्पीड ब्रेकर नसल्याने दि २७ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान बारा वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने धडकून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. प्रशासनाकडे वारंवार गतिरोधकची मागणी करूनही ते अद्याप करण्यात आले नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरून साधारणत: एक तास ठिय्या मांडून रास्ता रोको केला. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली मात्र पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने तात्काळ ग्रामस्थांनी माघार घेतल्याने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालू झाली.

निलंगा तालुक्यातील निलंगा उदगीर रोडवरील झरी येथे स्पीड ब्रेकर नसल्याने अपघात होत आहेत . म्हणून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने दि २७ एप्रिल रोजी येथे भरधाव वेगाने या रस्त्यावरून जाणा-या अज्ञात वाहनाने कृष्णा प्रकाश चव्हाण वय बारा वर्ष या तरुणास धडकून गेल्याने तो गंभीर जखमी झाला . त्याच्यावर लातूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत . स्पीड ब्रेकर नसल्याने दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी अपघात होऊन तिघे जण ठार झाले होते . वाहनाच्या गतीवर आवर यावा व अपघात होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे स्पीड ब्रेकरची मागणी करूनही ते केले जात नसल्याने अपघात होत आहेत . ग्रामस्थांनी दि २८ एप्रिल रोजी निलंगा उदगीर रोडवरील झरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यावर लाकडे टाकून जाळ लावत रस्त्यावर ठिय्या मांडला .

यामुळे साधारणत: एक तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली . रस्त्यावर लांबवर वाहनांच्या रांगा थांबल्या. सदर माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच तात्काळ पोलीस उपनिरीक्षक एस. के. सुरवसे , पोलीस उपनिरीक्षक सुनील पेद्देवाड , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बिरादार , हेड कॉन्स्टेबल रहमान पटेल , कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्यासह होमगार्ड घटनास्थळी जाऊन रीतसर सार्वजनिक बांधकाम विभागा कडे स्पीड ब्रेकरची मागणी करा, रास्ता रोको करून जनतेची हेळसांड करू नका असे म्हणत पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली. तदनंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR