वैद्यकीय प्रवेशासाठी १२०० विद्यार्थी पात्र, विद्यार्थ्यांची भरारी
लातूर : प्रतिनिधी
नीट परीक्षा पेपरफुटीत लातूरची बदनामी झाली. परंतु लातूर पॅटर्न म्हणजे बावन्नखशी सोने असून, त्याची प्रचिती नीट पेपरफुटीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा आली. कारण नीट फेरपरीक्षेत लातूर पॅटर्नने दमदार कामगिरी करत ऐतिहासिक लौकिक कायम राखला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कठोर परिश्रमाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर लातूर पॅटर्नचा दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले. कारण यंदाच्या निकालात एकट्या राजर्षि शाहू महाविद्यालयातून ४५० हून अधिक विद्यार्थ्यांना थेट एमबीबीएसला प्रवेश मिळणार आहे.
संपूर्ण लातूर पॅटर्नचा विचार केला तर राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लातूरचे १२०० ते १५०० हून अधिक विद्यार्थी प्रवेश मिळवतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षाही किती तरी पटीने अधिक असण्याची शक्यता आहे.
यंदा राजर्षी शाहू महाविद्यालयात सुमारे १,४०० विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ ६०० विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण पूर्ण झाले असून, यामध्ये तब्बल ४६ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ६०० हून अधिक गुणांचा टप्पा पार केला. उर्वरित ८०० विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण अद्याप प्रक्रियेत असून त्यानंतर ६०० पेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांची संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. याशिवाय ५३० पेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांची संख्या २०० पेक्षा जास्त आहे.
लातूरच्या शैक्षणिक
परंपरेला झळाळी
यंदाच्या नीट परीक्षेत केवळ एकच महाविद्यालय नाही तर लातूरमधील अनेक नामांकित शिक्षण संस्थांनी बाजी मारली आहे. यामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय, रिलायन्स लातूर पॅटर्न, बसवेश्वर महाविद्यालय आणि संत तुकाराम महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी नीटमध्ये उल्लेखनीय गुण मिळवले. या सर्व संस्थांच्या घवघवीत यशामुळे लातूरच्या शैक्षणिक परंपरेला पुन्हा एकदा नवीन उजाळा मिळाला आहे.
















