जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील पाटोदा बु., सोनवळा व धनगरवाडी परिसरातील साठवण तलावामध्ये सुमारे ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी उपसा बंद पडला आहे. त्यामुळे गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून शेतीसाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याने शेतक-यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित गावांतील शेतक-यांनी जळकोटचे तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. निवेदनात शेतक-यांनी म्हटले आहे की, साठवण तलावात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही वीज नसल्यामुळे पाणी उपसा करता येत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. तसेच सध्या खरीप हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असून वेळेवर सिंचन न झाल्यास उभी पिके करपून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शेतक-यांनी प्रशासनास इशारा देत सांगितले की, वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात आला नाही तर शेतीसह ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर होईल. त्यामुळे महावितरण विभागास तात्काळ सूचना देऊन साठवण तलावावरील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
















