33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींची पवार, ठाकरे यांना ऑफर

पंतप्रधान मोदींची पवार, ठाकरे यांना ऑफर

नंदूरबार/पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या विधानानंतर उलटसुलट चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवारांच्या विधानाचा संदर्भ देत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांना थेट ऑफर दिली आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवार यांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, असे म्हटले. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकशाहीवर विश्वास नसणा-यांसोबत आम्ही जाणार नाही, अशा शब्दांत पवार स्टाईल प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नंदूरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्या कॉंग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या विधानावर भाष्य केले. मोदी म्हणाले की, गेल्या ४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले असून त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करून असे वक्तव्य केले असावे, असे मला वाटते. चार जूननंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनात टिकून राहायचे असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल, असे त्यांना वाटत आहे. याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत. पण त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली.

यावर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन लोकशाही मान्य नसणा-यांसोबत आम्ही कदापि जाणार नाही, असे म्हटले. नरेंद्र मोदींमुळे लोकशाही धोक्यात आहे, मोदींनी सोरेन आणि केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. गांधी-नेहरुंची विचारधारा आम्हाला मान्य आहे. हा देश एकसंघ ठेवायचा आहे, त्यासाठी सर्वच धर्मांना सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे. पंतप्रधानांनी एका धर्माविषयी वेगळी भूमिका घेतल्याचे दिसून आले. एका समाजाविरुद्ध वेगळी भूमिका मांडल्यास ऐक्य राहणार नाही, असे म्हणत शरद पवारांनी मोदींच्या ऑफरवर भाष्य केले.

ही तर मोदींची अस्वस्थता : पवार
ही मोदींची अस्वस्थता आहे. त्यातूनच ते अशी विधाने करत आहेत, अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची ऑफर धुडकावली. मोदींना जरी आमची गरज पडत असेल तरी आम्ही आमच्या बुद्धीला जे पटते, त्या आमच्या विचारांना सोडून कुठेही जाणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

हा तर डोळे मारण्याचा प्रकार
आजपर्यंत तुम्ही शिवसेना फोडली-तोडली. राष्ट्रवादी फोडली-तोडली तरी कधी मला डोळा मार आणि पवारांना डोळा मार, हे काय, आज सकाळी पवारांना डोळा मारला. एकीकडे म्हणायचे नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि आता म्हणायचे आजा मेरी गाडी मे बैठ जा, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR