36 C
Latur
Wednesday, March 25, 2026
Homeमहाराष्ट्रपक्षावर ताबा मिळवण्यासाठी ‘ब्लॅक मॅजिक’

पक्षावर ताबा मिळवण्यासाठी ‘ब्लॅक मॅजिक’

रोहित पवारांचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर गंभीर आरोप दादांच्या अपघातामागे घातपाताचा संशय

बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पटेल आणि तटकरे यांना पक्षावर ताबा मिळवायचा होता, तसेच हा सगळा कट रचला गेला असल्याचा गंभीर आरोप आहे.

विधिमंडळ परिसरात रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तसेच ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि आणखी एका व्यक्तीच्या सह्या आहेत. या सह्या कशावर त्यांनी केल्या आहेत, एकतर त्यांनी खोटे सांगितले की त्यांचे कॉन्स्टिट्युशन जे आहे, प्रत्येक पक्षाचे एक कॉन्स्टिट्युशन असते. हे बदलण्यात आले आहे. त्यात जे कार्याध्यक्ष असतील त्यांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले जातील.

पुढे रोहित पवार म्हणाले, म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त १८ दिवस झाले होते आणि १६ फेब्रुवारी रोजी हे पत्र सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थ पवारला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता इलेक्शन कमिशनला देण्यात आले. विशेषत: अजितदादांची ताकद आणि पक्षाचे पूर्ण अधिकार प्रफुल्ल पटेल यांना दिले गेले. जे सुनेत्रा काकींना कळले असणार आणि त्यांनी लगेच पत्रव्यवहार केला.

अजितदादा जिवंत असताना घराबाहेर ‘ब्लॅक मॅजिक’
आता यात बघा अजितदादा जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केले जाते. कदाचित नाशिकचाच जो भोंदूबाबा आहे तिथे काळी जादू करण्याचा प्रयत्न होतो. याच्यामागे कारण म्हणजे पक्षावर ताबा मिळावा असे होते का? त्यानंतर २८ तारखेला अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला हे आम्ही शोधत आहोतच. त्यानंतर दुस-याच दिवशी म्हणजे दोन दिवसांत पीयूष गोयल यांचे स्टेटमेंट येते की, प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. नंतर ते म्हणाले की मी चुकून बोललो.

पक्षाचा कंट्रोल घ्यायचा प्रयत्न
पण क्रमवारी बघितली तर असे दिसते की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही इतर पक्षाच्या नेत्यांमध्ये या गोष्टी आधीच ठरल्या होत्या. हे आधीच ठरले होते की पक्षाचा कंट्रोल घ्यायचा आहे, तर मग जेव्हा अजितदादांच अन्त्यविधी होत होता तेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तिथे आले. काय हेतू घेऊन तिथे आले होते? त्याच्यामागे २७ तारखेच्या बैठकीचा देखील काय हेतू होता? या सगळ्या गोष्टींचा तपास केला गेला पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली