मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे महाजाळे पसरले असून, बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी एक मोठी ‘समांतर यंत्रणा’ सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी थेट नाव घेत परिवहन विभागाचे निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर निशाणा साधला. ‘खरमाटे हे या संपूर्ण वसुली रॅकेटचे मास्टरमाईंड असून त्यांनी स्वत:ची समांतर यंत्रणा उभी केली आहे. राज्यात परिवहन विभागात १०० रुपयांची वसुली झाली, तर त्यातील ९० रुपये स्वत: खरमाटे घेतात, असा खळबळजनक दावा वडेट्टीवारांनी केला. चंद्रपूरचे मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्यावर झालेली एसीबीची कारवाई हा याच रॅकेटचा एक भाग असून, त्यांना अडकवण्यासाठी रचलेला तो ‘प्री-प्लॅन्ड’ कट असल्याचेही त्यांनी सांगितले.
विदर्भातील ६४ अधिका-यांची छळवणूक
विदर्भात नव्याने रुजू झालेल्या ६४ अधिका-यांच्या पदोन्नतीत जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत. खैरनार आणि भुयार यांच्या मर्जीने या नियुक्त्या झाल्या नसल्यामुळे आता या अधिका-यांना लक्ष्य केले जात आहे. जे अधिकारी बेकायदेशीर वसुलीला नकार देतात, त्यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवण्याची किंवा तडकाफडकी बदली करण्याची धमकी दिली जाते, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.
खरात आणि झिरवाळ प्रकरणावर भाष्य
अशोक खरात प्रकरण आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थानाच्या वापरावरून वडेट्टीवारांनी सरकारवर बोचरी टीका केली. ‘काही लोक खुर्ची टिकवण्यासाठी किंवा विरोधकांना हटवण्यासाठी अघोरी विद्या आणि तंत्र-मंत्राचा आधार घेत आहेत. संविधानाची शपथ घेणा-या मंत्र्यांना हे शोभा देत नाही’, असे ते म्हणाले. झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणावर सरकारने पांघरूण घातल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मोठ्या माशांना अभय, अंतर्गत गँगवॉर सुरू
पुणे जमीन घोटाळा असो वा आरटीओमधील लूट, सरकार केवळ ‘लहान माशांचा’ बळी देत असून ‘मोठ्या माशांना’ वाचवत असल्याचा घणाघात वडेट्टीवारांनी केला. ‘सध्याच्या सरकारमध्ये मंत्र्यांचे एकमेकांविरुद्ध गँगवॉर सुरू आहे. प्रत्येक मंत्री दुस-याविरुद्ध कट रचण्यात व्यस्त आहे, ज्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे’, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधा-यांवर प्रहार केला.

