मुंबई : प्रतिनिधी
जर बबनराव लोणीकर म्हणत असतील की त्यांचा जन्म मोदींमुळे झाला, सगळ्या गोष्टी मोदींमुळे मिळतात, तर हा थेट जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. तसेच पहलगाममध्ये आमच्या माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच झाले का असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा समाचार घेतला.
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावर सरकारविरोधात पोस्ट करणा-या तरुणांना उद्देशून वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांनी केलेल्या विधानाचा सर्वच पातळ्यांवरून निषेध केला जात आहे.
अशातच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे. जर बबनराव लोणीकर म्हणत असतील की त्यांचा जन्म मोदींमुळे झाला, सगळ्या गोष्टी मोदींमुळे मिळतात, तर हा थेट जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा आणि लोकशाहीचा अपमान आहे, असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच, पहलगाममध्ये आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी यावेळेस पहलगाम हल्ल्यात ट्रम्प यांनी घेतलेल्या मध्यस्थीबाबतही हल्लाबोल केला. ट्रम्प यांच्या एका विधानामुळे भारताला माघार घ्यावी लागली, तेही मोदींमुळेच घडले. मुंबईतील मोक्याचे भूखंड अदानी समूहाला देण्यात आले, मराठी माणसाच्या घशातून काढून घेतले, तेही मोदींमुळेच, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, त्यांच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत. आणखी ब-याच गोष्टी आहेत. राज्याची जनता ही स्वाभिमानी आहे. जर हे लोणीकर यांना समजत नसेल, तर महाराष्ट्राने ओळखलं पाहिजे की अशा प्रवृत्तीचे लोक भाजपमध्ये सक्रिय आहेत, असे संजय राऊत म्हणाले.