कोलकाता : भारताने पहिल्याच टी-२० सामन्यात इंग्लंडला धुळ चारली. भारताच्या अभिषेक शर्माने यावेळी तुफानी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पण त्यापूर्वी भारताचा विजय सोपा केला तो गोलंदाजांनी. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी मोलाच्या विकेट्स मिळवल्या. त्यामुळे भारताला इंग्लंडच्या संघाला १३२ धावांवर ऑल आऊट करता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. पण अभिषेकने फलंदाजीत सातत्य दाखवले आणि भारताचा सात विकेट्स राखून विजय सुकर केला. या विजयासह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
अभिषेक शर्माने यावेळी वादळी फलंदाजी करताना ३४ चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ७९ धावांची दमदार खेळी साकारली. भारताकडून यावेळी वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी मिळवले. पण अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत वरुणला चांगली साथ दिल्याचे पाहायला मिळाले.