28.4 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeराष्ट्रीयपाकचा रडीचा डाव

पाकचा रडीचा डाव

नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, भारताने खोलली पोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानची गुरुवारपासून आगळीक सुरू असून भारतातील सीमेलगतच्या वेगवेगळ््या शहरांमध्ये गोळीबार सुरू केला आहे. त्याला भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर दिले. गुरुवारी रात्री पाकिस्तानने ४०० ड्रोनद्वारे भारताच्या जवळपास ३६ ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. तसेच क्षेपणास्त्रांचाही मारा केला. परंतु भारताने पाकिस्तानचे हे हल्ले निष्प्रभही केले. पण भारतावर हल्ला करणा-या पाकिस्तानने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचे पुरावे समोर आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रडीचा डाव खेळत नागरी हवाई क्षेत्र बंद न करता नागरी उड्डाणांचा थेट ढाल म्हणून वापर करणे सुरू आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या उपस्थितीत सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी गुरुवारच्या युद्धभूमीवरील घडामोडींची माहिती देताना पाकिस्तानची पोल खोलली. भारताने प्रतिहल्ला करू नये, म्हणून पाकिस्तानने नागरी विमानांसाठी हवाई हद्द बंद केली नाही. पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला असतानाही आपले नागरी हवाई क्षेत्र बंद केलेले नाही. उलट नागरी विमानांचा चक्क ढाल म्हणून वापर करणे सुरू केले. त्यामुळे पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना नागरी विमानांना आणि नागरिकांना नुकसान होऊ नये, म्हणून भारताने सावध पावले उचलत पाकला प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताची वायू हद्द ओलांडली, त्यावेळी भारताने ४ ड्रोनच्या माध्यमातून प्रतिहल्ला केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करून पाकिस्तानला भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद जाणून घ्यायची होती. पाकिस्तानने हल्ल्यासाठी वापरलेले ड्रोन तुर्कीचे होते. यातील बहुतांश ड्रोन भारताने नष्ट केल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
तिन्ही सेनादलांच्या
प्रमुखांशी मोदींची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्याच्या माजी प्रमुखांशी चर्चा केली. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात मोदींची सैन्याच्या माजी प्रमुखांशी चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बैठकीत रणनीती ठरली.
भारतातील २८ विमानतळे बंद
भारताने जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर, चंदिगढ, जोधपूरसह २८ विमानतळ बंद केले आहेत. २८ विमानतळ १५ मेच्या सकाळी ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत बंद असणार आहेत. त्यामुळे एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेटनं या शहरांमधून होणारी उड्डाणं रद्द केली. देशातील संवेदनशील विमानतळांची आणि त्यांच्या परिसरांची सुरक्षा वाढवण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR