पाथरी : तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील लोणी जुना तांडा परिसरात अचानक लागलेल्या आगीत १२ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे तुषार सिंचनासाठी वापरण्यात येणा-या पाईपचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मंडळाधिकारी, तलाठी यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. दरम्यान दुष्काळामुळे आधीच संकटात असताना या घटनेमुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील लोणी जुना तांडा परिसरातील गट क्रमांक २९२ मधील शेतक-यांच्या ऊस पिकाला आग लागल्याने सुमारे १२ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेत शिवाजी तुकाराम पवार, प्रकाश रामराव पवार, अशोक रामराव पवार आणि रामराव लालू पवार या लोणी जुना तांडा येथील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी शर्मा व मंडळाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. या आगीमध्ये उत्तम शिवाजी पवार यांच्या तुषार सिंचनासाठी वापरण्यात येणा-या पाईपचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे ऊसासाठी केलेला खर्च वाया गेला असून संबंधीत शेतक-यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. शासनाने नुकसानीची दखल घेऊन त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतक-यांनी केली आहे.
शेतकरी हतबल
शेतक-यांनी मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून ऊस पीक जोपासले होते. मात्र, आगीच्या घटनेमुळे हातातोंडाशी आलेले पीक जळून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिकासाठी मशागत, खते, औषधे, पाणी आणि इतर शेतीविषयक बाबींवर मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत उभे पीक जळून गेल्याने शेतक-यांनी केलेला खर्च वाया गेला असून, पुढील आर्थिक नियोजनावर परिणाम होणार असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे.
पाथरी तालुक्यातील जुना लोणी तांडा येथे घडलेल्या या घटनेमुळे लोणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुष्काळामुळे शेतकरी हैराण झाला असून पिके हातची गेल्याने सर्वच शेतकरी संकटात सापडले आहेत. नैसर्गिक संकटाचा सामना करत असतानाच संबंधीत शेतक-यांवर ऊस जळाल्याने संकट ओढवले असून याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
















