लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतक-यांना केवळ चार महसूल मंडळात विमा मंजूर झाला आहे. इतर महसूल मंडळातील शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असताना शेतक-यांना पीकविमा मिळाला नाही. त्यामुळे १ जून रोजी दुपारी १२ शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वात लातूर येथील कृषि अधीक्षक कार्यालयात चाबूक आपटत आंदोलन केले.
गतवर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतक-यांचे सोयाबीन पीक पूर्ण खरडून गेले. शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. मात्र रेणापूर तालुक्यातील पानगाव आणि औसा तालुक्यातील भादा, बेलकुंड आणि जळकोट तालुक्यातील घोणसी महसूल मंडळातील शेतक-यांना विमा मंजूर झाला. इतर महसूल मंडळातील पीक नुकसानीची दखलच घेण्यात आली नाही. याला जिल्हा कृषि कार्यालय आणि आय. सी. आय. सी. आय. लोम्बर्ड विमा कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे उर्वरित शेतक-यांचा पीकविमा तात्काळ देण्यात यावा. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी लातूर येथील जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात आले. शेतक-यांनी घोषणाबाजी करत कृषि अधीक्षक कार्यालयात चाबूक आपटून ठिय्या आंदोलन केले.
यावेळी विमा कंपनीचे प्रभास कुमार, कृषि अधीक्षक राजेंद्र कदम इतर अधिका-यांची भबेरी उडाली. शेतक-यांनी प्रश्नाचा भडीमार केला. तेव्हा कृषि अधीक्षक कदम यांनी आंदोलक शेतकरी, कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र येणा-या काळात शेतक-यांना जर विमा आला नाही तर शेतकरी संघटना आयसीआयसी लोबार्ड कंपनीचा ऑफिस फोडणार, असा इशारा शेतकरी संघटनेने शेवटी दिला. या आंदोलनात शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, भारतीय किसान सेना मराठवाडा प्रमुख बालाजी सूर्यवंशी, संपर्कप्रमुख दत्ता शिंगडे, तालुका प्रमुख सचिन निकम, युवा शेतकरी तालुकाप्रमुख सचिन खसे, वेंकट बोळंगे, अंगद खलंग्रे, दगडू कुसंगे, संगमेश्वर कोराटे, भागवत नागरगोजे, राजकुमार नागरगोजे, नानासाहेब जाधव, बाबू तिडके, जगन गवरे, बालाजी तिडके, इलाही शेख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
















