लातूर : प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील कुंटूर येथील ११ वर्षीय अल्पवयीन बालकावरील लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणाचा अत्यंत कौशल्यपूर्ण, शास्त्रीय आणि प्रभावी तपास करून आरोपीला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सध्या लातूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट अन्वेषण कार्याबद्दल २०२४ चे ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण)’ प्रदान करण्यात आले.
सी.पी.आर., पुणे येथे दि. ८ ऑगस्ट रोजी आयोजित विशेष समारंभात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांचा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय तपास कार्याची केंद्र शासनाच्या स्तरावर दखल घेतली गेल्याने लातूर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले. या पुरस्कारामुळे लातूर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या उत्कृष्ट तपास कार्याला निश्चितच प्रोत्साहन मिळाले असून, गंभीर गुन्ह्यांचा तपास अधिक शास्त्रीय, तांत्रिक आणि पुराव्यावर आधारित पद्धतीने करण्यासाठी हा गौरव प्रेरणादायी ठरणार आहे.















