छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातील गॉज पीस म्हणजेच कापडाचा तुकडा काढण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खाजगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान पोटात कपडा राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली असून सुरेखा गणेश काबरा असे पोटातून कपडा काढलेल्या महिला रुग्णाचे नाव आहे.
दरम्यान, सुरेखा यांची १० मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली. त्यानंतर सुरेखा यांचे नेहमी पोट दुखत असल्याने वाशिम येथे सोनोग्राफी करून त्यांचा रिपोर्ट सिझेरियन प्रसूती करणा-या डॉक्टरांना दाखवला तेव्हा त्या डॉक्टरांनी मूत्राशयाचा आजार असल्याचे सांगून उपचार घेण्यास सांगितले.
मात्र, त्यानंतरही पोट दुखतच राहिले अखेर सुरेखा यांनी छत्रपती संभाजीनगरातील एका खाजगी रुग्णालयात दाखवले. तेव्हा तपासणीत सुरेखा यांच्या पोटात गॉज पीस असल्याचे निदान झाले आणि याप्रकरणी रिसोड येथील डॉक्टरांवर सुरेखा यांचे पती गणेश काबरा यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर शस्त्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली
वाशिमच्या सरकारी रुग्णालयात अपेंडिक्सच्या ऑपरेशनदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याचा प्रकार समोर आला आहे. वाशिम जिल्हा रुग्णालयात १९ मे रोजी अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेवेळी ऑपरेशन दरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी या घटनेमागे ‘तांत्रिक बिघाड’ असल्याचे सांगत ती अनवधानाने घडल्याचे स्पष्टीकरण दिले.