सीबीआयची धाड, पुन्हा झाडाझडती
लातूर : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणी तपासाला चांगलाच वेग आला आहे. आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकरला अटक झाल्यानंतर सीबीआय तपास वेगात सुरू असून, लातुरात ठाण मांडून बसलेल्या सीबीआयने मोटेगावकराशी संबंधित व्यक्तींचीही झाडाझडती सुरू ठेवली आहे. त्यातच आज सीबीआयने मोटेगावकरच्या आरसीसी कार्यालयात जाऊन नातेवाईकांची चौकशी केली. नीट प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी पुन्हा एकदा सीबीआयचे पथक मोटेगावकर यांच्या खाजगी क्लासेसमध्ये दाखल झाले आहे. तपास यंत्रणेकडून विविध कागदपत्रांची पडताळणी तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात असल्याचे समजते. नातेवाईकांपैकी कोणाचा पेपर फुटीमध्ये सहभाग होता का, याबाबतही तपास सुरू आहे. मोटेगावकर यांच्या नातेवाईकांचा आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग होता का, तसेच पैशांची गुंतवणूक आणि व्यवहारांची साखळी काय होती याचा तपास सीबीआयकडून केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या कारवाईमुळे नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास आणखी व्यापक होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लातूरमधील आणखी
एक डॉक्टर ताब्यात?
नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये सीबीआय कसून तपास करीत आहे. यामध्ये डॉक्टरही रडारवर असून, लातूरमध्ये आता पाचवा डॉक्टर सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली. यामध्ये प्रसुती रोग आणि आयव्हीएफ तज्ज्ञाचा समावेश आहे. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे. या अगोदर सीबीआयने लातूरमध्ये चार डॉक्टरांच्या घरांवर छापा टाकून चौकशी केली होती.
रद्दी विकत घेणारे
५० जण रडारवर
नीटचा पेपर आणि नोट्स रद्दीत विकल्याची माहिती समोर आली असून, लातूरमधील जवळपास ५० रद्दी विकत घेणा-यांची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. आता रद्दीत गेलेल्या कागदपत्रांचाही तपास करण्यात येणार आहे. नीटची परीक्षा झाल्यानंतर २ डॉक्टरांनी नोट्स आणि इतर कागदपत्रे रद्दीत विकल्याची कबुली दिली.
















