पेट्रोल २.७१, डिझेल २.६१ रुपयांनी महाग
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा हल्ला झाला. देशात पेट्रोल, डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ झाली. अवघ्या १० दिवसांत तेल कंपन्यांनी चौथ्यांदा दरवाढ केली आहे. चार वर्षे किमती स्थिर ठेवल्यावर कंपन्यांनी १५ मे रोजी इंधनाचे दर वाढवले. तेव्हापासून सुरु झालेला दरवाढीचा सिलसिला कायम आहे. आतापर्यंत चारवेळा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर ७ रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे.
तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात लीटरमागे २.६१ रुपयांची वाढ केली तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २.७१ रुपयांची वाढ झाली. गेल्या १० दिवसांत इंधन दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. १५ मे रोजी इंधन दरात ३ रुपयांची वाढ झाली तर १९ मे रोजी दुस-यांदा इंधन दर वाढविले. पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे ९० पैशांची वाढ करण्यात आली. यानंतर २३ मे रोजी पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले. त्यानंतर आज (२५ मे) रोजी इंधन दरात लीटरमागे २ रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली.
२०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला तोंड फुटले. त्यामुळे खनिज तेलाचे दर भडकले. तेल कंपन्यांना नुकसान होऊ लागले. त्यांनी इंधनाचे दर वाढवण्यास सुरुवात केली. मार्च-एप्रिल २०२२ या कालावधीत १५ दिवसांत तब्बल १३ वेळा इंधन दरात वाढ झाली. यातील १० दिवस झालेली इंधन दरवाढ आतासारखीच होती. इंधन दरात हळूहळू वाढ झाली होती. एकूण झालेली दरवाढ १० रुपयांच्या घरात गेली. १० दिवस दररोज ८० पैसे प्रति लीटर दराने इंधनाचे दर वाढत होते.
देशात पेट्रोल, डिझेलचे दर याच प्रकारे वाढणार असल्याचे संकेत तेल कंपन्यांनी आधीच दिलेले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका वरिष्ठ कर्मचा-याने इंधन दरवाढीबद्दल सूचक विधान केले होते. ग्राहकांवरील परिणाम कमी करण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी कंपन्या पेट्रोल, डिझेलचे दर हळूहळू वाढवत आहेत. आम्हाला एका झटक्यात दरवाढ करायची नाही. कारण त्यामुळे महागाईवर परिणाम होईल, अशी माहिती अधिका-यानं दिली.
केंद्राकडून २०२२ च्या
पॅटर्नची पुनरावृत्ती
पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ पाहता मोदी सरकार २०२२ सालच्या पॅटर्नची पुनरावृत्ती करताना दिसत आहे. त्यावेळी रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकले होते. त्यामुळे खनिज तेलाचे दर वाढले होते. तेल कंपन्यांनी नुकसान भरपाई करण्यासाठी अवघ्या १५ दिवसांत १३ वेळा पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले होते. आताही त्याच प्रकारे इंधन दरवाढ होताना दिसत आहे.
आता महागाईचे भूत
सामान्यांच्या मानगुटीवर
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल दरवाढीचा धडाका सुरू ठेवला असून, १० दिवसांत चौथ्यांदा दरवाढ केली. त्यामुळे माल वाहतुकीचा दर वाढला असून, याचा परिणाम सर्वच मालावर होत आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. यासोबतच डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीकामेही महागणार आहेत. याचा भुर्दंड शेतक-यांना सोसावा लागणार आहे. यासोबतच बस आणि ऑटोचे भाडे वाढू लागले आहे. यामुळे महागाईचे भूत सामान्यांच्या मानगुटीवर बसले आहे.
















