20.9 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeराष्ट्रीय  प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ

  प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

दरम्यान, प्रियंका गांधी या लोकसभेच्या खासदार बनल्याने गांधी कुटुंबातील तीन सदस्य आता संसदेत दिसणार आहेत. त्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे लोकसभेचे तर त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी या राज्यसभेच्या सदस्य आहेत.

केरळमधील पारंपरिक साडी नेसून कुटुंबीय आणि नातेवाईकांसह संसद भवनामध्ये आलेल्या प्रियंका गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी प्रियंका गांधी या आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्यासोबत संसद भवनामध्ये आल्या. त्यावेळी राहुल गांधी यांनी संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर प्रियंका गांधी यांना थांबवून एक फोटो काढला. प्रियंका गांधी यांचा शपथविधी पाहण्यासाठी त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया हेही पोहोचले होते.

शपथ घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना नमस्कार करून अभिवादन केले. तसेच विरोधी पक्षांच्या पहिल्या रांगेत बसलेल्या नेत्यांनाही नमस्कार केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि प्रियंका गांधी यांचे बंधू राहुल गांधी यांनीही त्यांना नमस्कार करत अभिवादनाचा स्वीकार केला.

प्रियंका गांधी २०१९ पासून सक्रिय राजकारणात आहेत. त्या पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र कुठल्याही सभागृहाच्या सभासद म्हणून त्या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR