36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांची प्रतिमा खलनायकी

फडणवीसांची प्रतिमा खलनायकी

खासदार चव्हाणांनी डागली तोफ!

पुणे : लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या देशात वाहत आहेत. सगळ्याच पक्षांनी प्रचार सभांचा चांगलाच धडाका लावला आहे. यातच मागील काही काळात झालेल्या महाराष्ट्रातील सत्ताबदलांमुळे आणि पक्षफुटीमुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे. याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांनी वर्तविला आहे.

राज्यात गेल्या दोन वर्षांत झालेल्या तोडाफोडीच्या राजकारणामुळे तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या लोकांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देणे, सत्तेचा गैरवापर करणे यामुळे भाजपने केलेली महायुती मतदारांना नापसंत ठरली आहे. भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणाला मतदार कंटाळले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता खलनायकाच्या भूमिकेत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वंदना चव्हाणांना ‘लोकसभा निवडणुकीत कोणत्या मुद्यांभोवती प्रचार सुरू आहे?’ असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, ठराविक उद्योगांनाच मिळणारी सवलत, गैरव्यवहार, शेतक-यांच्या शेतमालाला भाव न मिळणे, कृषि उत्पादनांवर घालण्यात आलेली निर्यात बंदी, घसरता ुमन डेव्हलपमेंट इंडेक्स नागरिकांसाठी हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.

सामान्य कुटुंबाचे अर्थकारण सध्या महागाईमुळे बदलले आहे. बेराजगारी, नोकरीचे प्रश्न यामुळे तरुण वर्गात नाराजीचा सूर आहे. अयोध्येत राम मंदिर झाले, ही चांगली बाब आहे. परंतु हा काही विकासाचा आणि निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. शेवटी नागरिकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. भाजपकडून करण्यात येणारे प्रचाराचे मुद्दे म्हणजे कलम ३७० हटविले तसेच ‘एनआरसी’ची अंमलबजावणी केली, या मुद्यांना नागरिकांचा विरोध आहे.

या प्रश्नांवर चव्हाण म्हणाल्या, महाविकास आघाडीला मतदारांचा वाढता प्रतिसाद आहे. आमच्या पक्षाचे नेते शरद पवार तसेच उबाठा शिवसेनेचे नेत्यांचे आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभांना मिळणा-या प्रतिसादाने आमचा हुरूप वाढला आहे.

रोज चित्र बदलत असून ते आमच्यासाठी आशादायी आहे. भाजपाच्या पक्षफोडीच्या राजकारणाला मतदार कंटाळले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नागरिकांच्या मनात नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. त्याचा फटका महायुतीला निश्चित बसेल. महायुतीपेक्षा निश्चितच जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील.

महाराष्ट्रात आतापर्यंत राजकारण्यांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी ते व्यक्तिगत स्तरावर कधीही नव्हते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांत भाजपामुळे राजकारणाचा स्तरच घसरला आहे. त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आंदोलने केली, चौकशांचा सपाटा लावला त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करण्याची वेळ भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांनी राजकारणाचा खेळ मांडला आहे. पवार साहेबांवर रोज बेफाम आरोप होत आहेत. पण मतदारांमध्ये पवार साहेबांप्रति प्रचंड आदर आणि प्रेम आहे. आमची भिस्त मतदारांवर आहे. मतदात्यांना सगळ्या बाजू समजतात. शरद पवारांनी कधीही स्तर सोडून प्रचार केलेला नाही. त्यांच्या समाजाभिमुख भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR