36 C
Latur
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये पहिल्यांदाच मराठा-वंजारी मैत्री पर्व

नाशिकमध्ये पहिल्यांदाच मराठा-वंजारी मैत्री पर्व

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा १५ वर्षांनंतर वेगळे राजकारण घडताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्ये प्रमुख पक्ष दुय्यम भूमिकेत आहेत. मुख्य लढत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे गटात होत आहे. यात मतांचे ध्रुवीकरण होण्या ऐवजी राजाभाऊ वाजेंमुळे  पहिल्यांदाच मराठा-वंजारी मैत्री पर्व सामाजिक सलोख्याचे पर्व दिसून येत आहे.

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मुख्य लढत शिवसेना-भाजप युतीचे खासदार हेमंत गोडसे आणि काँग्रेस आघाडीचे छगन भुजबळ यांच्यात होत आली आहे. या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवार पक्ष आणि पक्षाचे चिन्ह घेऊन लढतो. राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक मात्र शेवटच्या टप्प्यात जातीच्या राजकारणाकडे निवडणूक घेऊन जात आले आहेत. त्यामुळे नाशिकची निवडणूक सातत्याने राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भुजबळ विरुद्ध गोडसे असा सरळ सामना होता. हे सर्व सामाजिक संदर्भ आणि राजकारण मोडीत काढून नवे सामाजिक समीकरण घडविण्यात पहिल्यांदा कारणीभूत ठरले ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नाशिक मतदारसंघातून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यायची होती.

त्यासाठी प्रचंड ओढाताण झाली. मात्र, एकमत न झाल्याने अखेर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. परिणामी नाशिकमध्ये महायुतीचे खासदार गोडसे यांची लढत महाविकास आघाडीच्या माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याशी होत आहे. तिसरे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर हे देखील याच पारंपरिक बहुजन समाजाच्या जडणघडणीतील आहेत. त्यामुळे मुख्य लढत मराठा विरुद्ध मराठा अशी दिसते आहे. यामध्ये ओबीसी अर्थात प्रामुख्याने वंजारी समाज ‘की फॅक्टर’ म्हणून भूमिका पार पाडताना दिसतो आहे.

उमेदवार निश्चितीतील ही राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता यंदाची निवडणूक अतिशय रंजक होणार, हे स्पष्ट आहे. एरवी निवडणुकीमध्ये सिन्नर अर्थात नाशिकचा विचार करताना मराठा आणि वंजारी हे दोन प्रमुख समाज दोन वेगळ्या वाटेने जाताना दिसतात. प्रत्येक निवडणुकीत हे दोन्ही समाज परस्परांच्या विरोधात राजकीय खेळी करीत असतात. त्याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होत आला आहे. यंदाची निवडणूक मात्र अनपेक्षितपणे त्याला अपवाद ठरली आहे.

माजी आमदार वाजे हे सिन्नरचे आहेत. त्यांची प्रतिमा सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणारे अशी आहे. त्यामुळे सातत्याने त्यांना मराठा आणि वंजारी या दोन्ही समाजांचा पाठिंबा मिळत आला आहे. लोकसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. हे दोन्ही समाज पहिल्यांदाच हातात हात घालून एकाच उमेदवारासाठी तन-मन-धनाने झटत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR